नाशिक, (प्रतिनिधी) २० मे - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी आणि देश-विदेशातील भाविकांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ओझर (नाशिक) येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या संपूर्ण बांधकाम आराखड्याला नवी दिल्ली येथील 'नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी' (DGCA/BCAS) अधिकृत मंजुरी दिली आहे. एरोड्रम सल्लागार समितीनेही या कामावर शिक्कामोर्तब केले असून, मंजुरीचे अधिकृत पत्र ओझर विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता विमानतळाच्या विस्तारिकरण कामाला बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे.
५६० कोटींचा निधी; प्रवासी क्षमता तीनपट वाढणार
पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक विमानाने येण्याची शक्यता आहे. हीच गरज ओळखून राज्य शासनाने विमानतळ विस्तारीकरणासाठी तब्बल ५६० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या विस्तारिकरणामुळे ओझर विमानतळाची सध्याची प्रवासी हाताळण्याची क्षमता थेट तीन पटीने वाढणार आहे.
नव्या आराखड्यात नेमके काय आहे?
मंजूर झालेल्या नवीन बांधकाम आराखड्यानुसार ओझर विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत:
नवे ॲप्रॉन आणि टॅक्सी वे: विमानांच्या पार्किंगसाठी नवीन 'ॲप्रॉन'चे (Apron) बांधकाम केले जाईल, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या ॲप्रॉनचा विस्तार करण्यात येईल. विमानांच्या सुलभ हालचालींसाठी नवीन 'टॅक्सी वे'ची (Taxiway) निर्मिती केली जाणार आहे.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य: विस्तारीकरणाचे काम करताना हवाई सुरक्षेच्या सर्व नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश दिल्लीहून देण्यात आले आहेत. यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे.
दळणवळणाचा समन्वय: विमानांच्या दैनंदिन संचालनात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून चालू कामाची इत्यंभूत माहिती दररोज विमानतळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान
ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे केवळ कुंभमेळ्याच्या भाविकांनाच जलद प्रवासाची सुविधा मिळणार नाही, तर नाशिक जिल्ह्याच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाने हे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे चोख नियोजन केले असून, कुंभमेळ्याचा मुख्य ध्वजारोहण सोहळा सुरू होण्यापूर्वीच हे सर्व काम शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.