परळी वैजनाथला भव्य शिवमूर्ती आणि लेझर शो... किल्ले अजिंक्यताऱ्यावर लटकता पूल... बघा कुठे आणखी काय काय होणार?

Share:
Main Image
Last updated: 19-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ मे - राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करतानाच सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील ६ प्रमुख तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक समाधी स्थळे आणि गडकिल्ल्यांच्या विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या निधीला आणि सुधारित आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

६ प्रमुख विकास आराखडे आणि मंजूर निधी:
१. श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास (निधी: १७२.२२ कोटी रुपये)
ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २.७ मीटरचे रस्ते आता ७ मीटरपर्यंत रुंद केले जातील आणि वळण रस्ते बांधले जातील.
अत्याधुनिक बस स्थानक, पार्किंग, पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, एम्फीथिएटर आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल.
भविष्यात डिंभे धरण परिसरात केबल कार (रोपवे) सुविधा आणि एमटीडीसी (MTDC) रिसॉर्टचा विकास केला जाईल.
२. संत तुकाराम महाराज जन्मस्थान, देहू (निधी: ४१.७१ कोटी रुपये)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराचा सर्वंकष विकास केला जाईल.
रस्ते सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था आणि सुसज्ज माहिती केंद्र उभारले जाईल.
भंडारा डोंगर परिसरात हरित क्षेत्र संवर्धन आणि वृक्षारोपणाद्वारे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखले जाईल.
३. ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा, सातारा (निधी: १३४.८० कोटी रुपये)
साताऱ्याची शान असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन आणि संवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल.
किल्ल्यावर पायाभूत सुविधांचा विकास, प्रेक्षक गॅलरी, राज सदरेचे पुनरुज्जीवन आणि बुरुजांचे संवर्धन केले जाईल.
पर्यटकांच्या आकर्षणासाठी एक अत्याधुनिक लटकता पूल (Hanging Bridge), नवे पादचारी मार्ग आणि लँडस्केपिंग केले जाईल.
४. संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन, सातारा (निधी: १३३ कोटी रुपये)
कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमावर असलेल्या या ऐतिहासिक परिसराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवले जाईल.
महारानी ताराबाई, महारानी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार केला जाईल.
ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन करून नवीन झुलता पूल, व्ह्यूइंग गॅलरी आणि सुसज्ज पाथवे निर्माण केला जाईल.
५. श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरुळ (निधी: २१०.४५ कोटी रुपये)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरासाठी ५३.८२ कोटींच्या वाढीव निधीसह सुधारित २१० कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
भाविकांसाठी आधुनिक भक्त निवास, दर्शन बारी (प्रतीक्षागृह), शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि फंक्शन हॉल बांधला जाईल.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी १.६ किमीचा बाह्य वळण रस्ता (बायपास) वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
६. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, बीड (निधी: ३०१.५४ कोटी रुपये)
परळी वैजनाथ मंदिर परिसर विकासासाठी ३०१ कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडा मंजूर करण्यात आला असून ही कामे ३ टप्प्यांत होतील:
टप्पा १: मुख्य मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वारे, डिजिटल रांग व्यवस्था, प्रतीक्षागृहे, अन्नछत्र आणि योग-ध्यान केंद्र.
टप्पा २: हरिहर व मार्कंडेय तीर्थांचे वैज्ञानिक पुनरुज्जीवन, घाट, सायकल ट्रॅक आणि सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था.
टप्पा ३ (मेरू पर्वत विकास): मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्ती, शिवपुराण व वैदिक संग्रहालय, ॲम्फीथिएटर आणि लेझर लाईट अँड साऊंड शो.

Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पांचे सादरीकरण
बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भीमाशंकर व देहू आराखड्याचे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घृष्णेश्वर व परळी वैजनाथचे, तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी किल्ले अजिंक्यतारा व संगम माहुली संवर्धन प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या लोकहितैषी कामांचाही या आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

थोडक्यात काय तर...
या महाप्रकल्पामुळे महाराष्ट्रातील धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार असून, भाविकांचा प्रवास अधिक सुकर आणि सुखकर होणार आहे.

?s=20

Comments

No comments yet.