मुंबई, (प्रतिनिधी) १९ मे - राज्यभरातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेबाबत सध्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांना सरकारने पूर्णविराम दिला आहे. ज्या महिला अद्याप ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत, त्यांना जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले नाहीत, असे अधिकृत स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागातर्फे आज जारी करण्यात आले आहे.
कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी न झालेल्या महिलांनी शासकीय कार्यालयात कागदपत्रे जमा करावीत, अशा प्रकारच्या बातम्या आणि संदेश फिरत होते. यामुळे महिला भगिनींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते आणि कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की, या संदर्भात कोणताही नवीन निर्णय किंवा आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही.
महिला व बालविकास विभागाने काय म्हटले?
अफवांवर विश्वास ठेवू नका: ई-केवायसी संदर्भात सोशल मीडियावर फिरणारे मेसेज चुकीचे असून, कोणत्याही लाडक्या बहिणीने अशा चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
निर्देश दिलेले नाहीत: जिल्हा स्तरावरील कार्यालयांमध्ये थेट कागदपत्रे स्वीकारण्याचे कोणतेही निर्देश शासनाने दिलेले नाहीत.
अधिकृत माहितीवरच भर द्या: योजनेबाबत कोणताही बदल किंवा नवीन निर्णय झाल्यास तो अधिकृत शासकीय माध्यमांतून जाहीर केला जाईल.
?s=20