नाशिक, (प्रतिनिधी) १८ मे - वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ आणि क्लिष्ट मानली जाणारी ‘फिटस इन फिटू’ (Fetus in fetu) ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात नाशिकच्या 'एसएमबीटी' (SMBT) हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे. बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अंजली चितळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका चिमुरड्याच्या पोटातील अविकसित अर्भकाचे अवशेष यशस्वीरित्या बाहेर काढून त्याला नवजीवन दिले आहे. जगभरात अशा प्रकारच्या अत्यंत मोजक्या केसेसची नोंद असून, या अभूतपूर्व कामगिरीबद्दल वैद्यकीय वर्तुळासह सर्व स्तरातून डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
पोट फुगणे आणि उलट्यांच्या त्रासातून उघड झाले गंभीर निदान
संबंधित चिमुरड्याला पोट फुगणे, सतत होणाऱ्या उलट्या आणि दूध न पचणे अशा तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत त्याच्या पोटात मोठी गाठ असल्याचे दिसून आले. मात्र, अत्याधुनिक रेडिओलॉजिकल चाचणी (सीटी स्कॅन/एमआरआय) केली असता, बाळाच्या पोटातील 'रेट्रोपेरिटोनियम' भागात एका दुसऱ्या अविकसित मानवी अर्भकाचे अवशेष असल्याचे धक्कादायक निदान झाले.
बाहेर काढलेल्या अवशेषांमध्ये पाठीचा कणा आणि हात-पायांची प्राथमिक रचना विकसित झाल्याचे दिसून आले. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, कारण त्या अविकसित अर्भकाचा रक्तपुरवठा मुख्य बाळाच्या प्रमुख रक्तवाहिन्यांशी जोडलेला होता. एसएमबीटीच्या तज्ज्ञांनी अत्यंत कौशल्याने मुख्य अवयवांना कोणताही धक्का न लावता हे अवशेष वेगळे केले.
काय आहे ‘फिटस इन फिटू’ स्थिती?
जागतिक आकडेवारीनुसार, दर ५ लाख जिवंत जन्मांमागे केवळ एका बालकात ही विसंगती आढळू शकते. १८ व्या शतकात पहिल्यांदा या स्थितीचे वर्णन झाले असून, आतापर्यंत संपूर्ण जगभरात अशा केवळ २०० पेक्षा कमी केसेसची अधिकृत नोंद झाली आहे.
याबाबत बोलताना डॉ. अंजली चितळे यांनी सांगितले की, "या स्थितीच्या कारणांबाबत गर्भावस्थेतील एक सिद्धांत महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार, जेव्हा आईच्या गर्भात एकाच बिजांडापासून दोन जुळी मुले (Twins) वाढू लागतात, तेव्हा पेशींच्या असमान विभाजनामुळे एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात पूर्णपणे सामावला जातो. याला ‘पॅरासिटिक ट्विन’ किंवा परजीवी जुळे असेही म्हणतात."
तज्ज्ञांच्या जंगी पथकाने पेलले आव्हान
ही हाय-रिस्क शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अंजली चितळे यांच्यासोबत डॉ. प्रखर नागर, डॉ. अनुप्रित सातपुते, डॉ. सविनय पाटील, डॉ. अनुज रंगम, डॉ. अश्रित राळे, डॉ. दिव्या सिंग, डॉ. प्रियांका खर्डे यांच्यासह बालरोग, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी विभागातील सर्व तज्ज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतली. शस्त्रक्रियेनंतर बाळ आता पूर्णपणे सुखरूप असून त्याची प्रकृती वेगाने सुधारत आहे. या यशाबद्दल एसएमबीटी प्रशासनाकडून संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभिनंदन करण्यात आले.
पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला: ‘अँटी-नेटल सोनोग्राफी’ अनिवार्य!
अशा केसेसमध्ये अनेकदा जन्मानंतर लगेच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे पालकांनी खालील बाबींची काळजी घ्यावी:
बाळाचे पोट असामान्यपणे फुगलेले दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दूध पिण्यास त्रास होणे किंवा वारंवार उलट्या होणे या बाबींकडे दुर्लक्ष करू नये.
गर्भावस्थेदरम्यान नियमित 'अँटी-नेटल' सोनोग्राफी (ANC Scan) करणे अनिवार्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भात असतानाच अशा विसंगतींचे निदान होऊ शकते.
"सामान्य रुग्णालयांमध्ये ज्या केसेस हाताळणे कठीण असते, अशा गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ वैद्यकीय केसेस यशस्वीरित्या सोडवणे ही एसएमबीटी रुग्णालयाची ओळख आहे. अचूक निदानासाठी आवश्यक असलेली जागतिक दर्जाची साधनसामग्री एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळेच हे यश मिळाले."
— सचिन बोरसे, संचालक (आरोग्यसेवा), एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट