सरकारी नोकरीची जाहिरात... थेट ५८ वर्षांचा करार..

Share:
Main Image
Last updated: 19-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ मे - ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (मग्रारोहयो) अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, ही जाहिरात पूर्णपणे बोगस असून सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी शासनाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी आणि फसवणुकीचा प्रयत्न केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे सोशल मीडियावरील 'ती' जाहिरात?

सध्या व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘रोजगार हमी योजना विभागांतर्गत महाराष्ट्रात तात्काळ भरती! स्थिर नोकरीची आकर्षक संधी!’ अशा आशयाची जाहिरात राज्यभर पसरवली जात आहे. या जाहिरातीत प्रामुख्याने खालील बाबी नमूद करण्यात आल्या आहेत:

पदे: कार्यक्रम तांत्रिक अधिकारी (PTO), सहायक कार्यक्रम अधिकारी (APO) आणि क्लार्क कम डेस्क ऑफिसर (CDO).

आमिष: तब्बल ५८ वर्षांच्या कराराधारित नियुक्तीचे आमिष दाखवण्यात आले आहे.

शुल्क: नोकरीच्या नोंदणीसाठी तब्बल १ हजार ५०० रुपये शुल्क भरण्याची अट घालण्यात आली आहे.

Advertisement

कोणतीही भरती सुरू नाही: मंत्री भरत गोगावले

या बोगस जाहिरातीची गंभीर दखल घेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, "शासनाच्या रोजगार हमी योजना विभागामार्फत सध्या अशी कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही. तसेच थेट भरतीसाठी कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ही जाहिरात पूर्णपणे खोटी, बेकायदेशीर आणि दिशाभूल करणारी आहे."

"विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा डाव आहे. या बोगस जाहिरातीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरुणांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारची संशयास्पद लिंक किंवा जाहिरात आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा."

- भरत गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना

सायबर पोलिसांचा तपास सुरू

या बोगस जाहिरातीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मरीन लाईन्स पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सोशल मीडियावर ही जाहिरात सर्वप्रथम कोणी व्हायरल केली आणि यासाठी कोणते बँक खाते किंवा डिजिटल पेमेंट आयडी वापरले जात आहेत, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

?s=20

Comments

No comments yet.