सातारा, (प्रतिनिधी) १८ मे - "भविष्यात हायड्रोजन इंधन हेच देशाचे मुख्य सामर्थ्य असणार आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी आता केवळ 'अन्नदाता' म्हणून मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'ऊर्जदाता' आणि 'इंधनदाता' व्हावे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रयोग शेती क्षेत्रात होणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सातारा येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात नितीन गडकरी यांना माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
१००% इथेनॉलवर चालणारी वाहने लवकरच!
आपल्या भाषणात इंधन क्रांतीवर भर देत गडकरी म्हणाले की, देशात लवकरच १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यावर धावताना दिसतील. यामुळे भारताचे पेट्रोलवरील अवलंबित्व पूर्णपणे कमी होईल आणि इंधन आयातीवर होणाऱ्या देशाच्या अब्जावधी रुपयांच्या खर्चात मोठी बचत होईल. बायो इंधनाचा पर्याय सर्वांनी स्वीकारल्यास, लवकरच विमान वाहतूक क्षेत्रातही याचा वापर सुरू होईल. यामुळे भारत इंधन आयात करणारा नाही, तर भविष्यात 'इंधन निर्यात' करणारा देश बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे-सातारा प्रवास अवघ्या एका तासात!
पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्र्यांनी मोठी घोषणा केली. "आगामी काळात पुणे ते सातारा हा प्रवास अवघ्या एका तासात, तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल. तसेच, येत्या तीन वर्षांत देशातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण होतील," अशी ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय, देशात लवकरच 'वेस्ट प्लास्टिक' (टाकाऊ प्लास्टिक) पासून रस्ते बनविण्याचा अभिनव प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
'पाणी हीच खरी संपत्ती'
शेती क्षेत्रात बायो इंधनाचा वापर वाढविण्याचे आवाहन करताना गडकरी यांनी जलसंधारणावर विशेष भर दिला. "पाणी हीच देशाची खरी संपत्ती आहे. आपण जर जलसंधारणावर योग्य लक्ष दिले, तर शेतीचा कायापालट होऊन ती अधिक फायदेशीर ठरेल," असे सांगत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरण्याचे आवाहन केले.