नाशिकमध्ये गुंडगिरी... छेडछाडीची तक्रार आईकडे केल्याने संतप्त तरुणाचा तरुणीवर हल्ला... रस्त्यात कपडे फाडून विनयभंग...

Share:
Main Image
Last updated: 18-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ मे - "तुमचा मुलगा माझा नेहमी पाठलाग करतो," अशी तक्रार संशयित तरुणाच्या आईकडे केल्याचा राग मनात धरून एका ३१ वर्षीय तरुणाने तरुणीला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात शनिवारी (दि. १६) रात्री हा प्रकार घडला. या हिंसक हल्ल्यात संशयिताने तरुणीचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

गणेश पारखे (वय ३१, रा. साईबाबा चौक, हिंदी शाळेजवळ, श्रमिकनगर, सातपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गणेश हा पीडित तरुणीचा सातत्याने पाठलाग करून तिला त्रास देत होता. संशयिताच्या या छळाला कंटाळून पीडितेने त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईकडे या प्रकाराची वाच्यता केली होती.

पीडितेच्या तक्रारीनंतर आईने घरी मुलाला या वर्तणुकीबद्दल जाब विचारला. आईने जाब विचारल्यामुळे गणेशचा राग अनावर झाला.

रात्रीच्या सुमारास गाठून हल्ला

Advertisement

याच रागातून शनिवारी रात्री पीडित तरुणी तिच्या घराच्या परिसरातून जात असताना, संशयित गणेशने तिला रस्त्यातच गाठले. त्याने अत्यंत हिंसक होत तरुणीला जाहीररीत्या अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान संशयिताने तरुणीचे कपडे फाडून तिचा गंभीर विनयभंग केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी पीडित तरुणीने तात्काळ सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित गणेश पारखे याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार घारे करत आहेत.

मंगळसूत्र ओरबाडून नेले

नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना रवी शंकर मार्ग भागात घडली. या घटनेत सुमारे ५५ हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

रोझी कल्पेश अघेरा (रा.सल्ली पॉईट वडाळागाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अघेरा रविवारी (दि.१७) रात्री नाशिक पुणा मार्गावरील विजय ममता सिग्नल भागात असलेल्या ज्युडिओ मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून त्या रवी शंकर मार्गाने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. अर्जुन भवन हॉल भागात दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ५५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले.उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.