नाशिक, (प्रतिनिधी) १८ मे - शहरात घरफोडीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. वेगवेगळ्या तीन भागात झालेल्या मोठ्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत तब्बल १३ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. यामध्ये रोकडसह सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव, गंगापूर आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१) महात्मानगर : विवाह सोहळ्यासाठी पुणे येथे जाताच ८ लाखांची घरफोडी
घरफोडीची पहिली आणि सर्वात मोठी घटना महात्मानगर भागात घडली. याप्रकरणी मिलिंद सखाराम पाटील (रा. दयाल अपार्टमेंट, एस. आर. पेट्रोल पंपाशेजारी, महात्मानगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील कुटुंबिय ९ ते १७ मे दरम्यान एका विवाह सोहळ्यानिमित्त पुणे येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून तब्बल ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करत आहेत.
२) अमृतधाम : साळुंके कुटुंबिय बाहेरगावी जाताच सव्वा पाच लाखांवर डल्ला
दुसरी घटना अमृतधाम परिसरातील हनुमाननगर भागात घडली. चेतनकुमार दौलतराव साळुंके (रा. सेरेनेटी टॉवर, हनुमाननगर, अमृतधाम) यांनी याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळुंके कुटुंबिय दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेली ३८ हजार रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख १४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घोडे करत आहेत.
३) मेरी लिंकरोड : रो-बंगलो फोडून ४५ हजारांची चोरी
तिसरी घटना मेरी लिंकरोडवरील चक्रधरनगर भागात घडली. अजय शरद जडे (रा. कृष्णा रो-बंगलो, श्रीनाथ स्वीट्सच्या मागे, मेरी लिंकरोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जडे कुटुंबिय बुधवारी (दि. १३) बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद रो-बंगलोचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातून २३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार केशव भोये करत आहेत.
नागरिकांना आवाहन आणि पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे अनेक नागरिक घरे बंद ठेवून बाहेरगावी जात आहेत. याचाच फायदा चोरटे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात तसेच शेजाऱ्यांना आणि स्थानिक पोलिसांना कल्पना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.