शिर्डी, (प्रतिनिधी) १८ मे - अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जात असून, जिल्ह्याला देशातील एक महत्त्वाचे 'संरक्षण उत्पादन केंद्र' (Defence Hub) म्हणून विकसित करणारा भव्य प्रकल्प साकार झाला आहे. शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
१००% स्वदेशी तंत्रज्ञान; प्रतिवर्षी ५ लाख तोफगोळ्यांची निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेला बळ देणारा हा प्रकल्प अवघ्या एक वर्षात उभारण्यात आला आहे.
क्षमता: या कारखान्यात १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन केले जाणार आहे. प्रतिवर्षी ५ लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता असून, खाजगी क्षेत्रातील ही देशातील सर्वांत मोठी क्षमता आहे.
स्वदेशी बनावट: या प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णपणे स्वदेशी आहे.
अतिरिक्त प्रकल्प: उद्घाटनाच्याच दिवशी शिर्डीत प्रतिदिन १५ टन क्षमतेच्या 'बायो-सीएनजी' प्रकल्पाचेही लोकार्पण केले जाईल.
शिर्डी एमआयडीसीत १,००० कोटींची गुंतवणूक; ड्रोन आणि रॉकेट लाँचरचीही चाचणी होणार
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे २०० एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित केले जात आहेत. यामध्ये तोफगोळ्यांशिवाय रॉकेट लाँचर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा उभारल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यापैकी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. यातून सुमारे २,००० नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
श्रीगोंद्यात २,००० कोटींचे भव्य 'दारूगोळा निर्मिती संकुल'
जिल्ह्यातील संरक्षण क्षेत्राचा विस्तार करताना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ६०० एकर जागेवर भव्य 'दारूगोळा निर्मिती संकुल' उभारण्यात येत आहे.
या संकुलात टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्ससारख्या स्फोटकांची निर्मिती केली जाईल.
यासाठी २,००० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली जाणार आहे.
येथे दरवर्षी २०,३०० टन टीएनटी उत्पादनाची क्षमता निर्माण होणार असून, ही सरकारी व खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी क्षमता ठरेल.
महत्त्वाचा दुवा: शिर्डी येथे तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटके (Ammunition Filling) भरण्याचे महत्त्वाचे काम या प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे. सर्व प्रकल्प सुरू झाल्यावर जिल्ह्यात एकूण ४ ते ५ हजार तरुणांना रोजगार मिळेल.
तरुणांसाठी कौशल्य विकास आणि टाटा ट्रस्टचे 'इनोव्हेशन सेंटर'
स्थानिक तरुणांना या संरक्षण उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांच्या कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. 'रतन टाटा ट्रस्ट'च्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीत २०० कोटी रुपये खर्चाचे विशेष 'इनोव्हेशन सेंटर' सुरू करण्यात येत आहे. यासाठी एमआयडीसीकडून ५० कोटींचा निधी मिळाला आहे. तसेच, राहाता येथील शासकीय आयटीआय (ITI) एमआयडीसी परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे.
२३ व २४ मे रोजी भव्य 'संरक्षण प्रदर्शन'
या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून २३ आणि २४ मे रोजी शिर्डीत विशेष 'संरक्षण प्रदर्शनाचे' (Defence Exhibition) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या आणि १०० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातील तरुण आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी केले आहे.