मुंबई, (प्रतिनिधी) १८ मे - आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफची शर्यत कमालीची रंगतदार झाली आहे. पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने १८ गुणांसह प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. चालू हंगामात प्लेऑफचे तिकीट मिळवणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे, चाहत्यांची निराशा करत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे या स्पर्धेतील आव्हान आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.
आरसीबीची बाद फेरीत धडक, गुजरात मजबूत स्थितीत
बंगळुरूने १३ सामन्यांपैकी ९ सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. आरसीबीचा नेट रन रेट (+१.०६५) सर्वोत्तम आहे. दुसऱ्या स्थानावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ १६ गुणांसह असून, त्यांचेही प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. सनरायझर्स हैदराबाद १२ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून प्लेऑफच्या अगदी जवळ आहे.
चौथ्या स्थानासाठी 'महायुद्ध'!
गुणतालिकेतील चौथ्या स्थानासाठी सध्या चार ते पाच संघांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
पंजाब किंग्स: १३ सामन्यांत १३ गुणांसह सध्या चौथ्या स्थानावर आहे, मात्र त्यांचा केवळ एकच सामना शिल्लक आहे.
चेन्नई आणि राजस्थान: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) चे प्रत्येकी १२ गुण असून त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. नेट रन रेटच्या किरकोळ फरकामुळे राजस्थान पाचव्या तर चेन्नई सहाव्या स्थानावर आहे.
दिल्ली आणि कोलकाता: दिल्ली कॅपिटल्स (१२ गुण) आणि कोलकाता नाइट रायडर्स (११ गुण) यांच्याही प्लेऑफच्या गणितीय शक्यता अजून जिवंत आहेत.
मुंबई, लखनऊचा गाशा गुंडाळला!
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. १२ सामन्यांत केवळ ४ विजय मिळवता आल्याने ८ गुणांसह मुंबईचा संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचीही अवस्था मुंबईसारखीच झाली असून, खराब नेट रन रेटमुळे ते गुणतालिकेत तळाला (१० व्या स्थानावर) फेकले गेले आहेत. मुंबई आणि लखनऊचे उर्वरित सामने आता केवळ प्रतिष्ठेचे उरले आहेत.
असा आहे गुण तक्ता...