सिन्नरच्या ऐतिहासिक वैभवाची हेळसांड... जगप्रसिद्ध गोंदेश्वर मंदिराची दुरावस्था... सिंहस्थात तरी काही होणार?

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ मे - यादव काळातील वास्तुकलेचा अद्वितीय नमुना आणि राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या सिन्नर येथील प्राचीन ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या सुरक्षेचा आणि दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या देखण्या मंदिर परिसरातील अस्वच्छता, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आणि सुरक्षारक्षक नसल्याने मौल्यवान मूर्तींच्या चोरीची असलेली भीती, या सर्व बाबींकडे लक्ष वेधत म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे यांनी पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पर्यटकांसाठी एकही स्वच्छतागृह नाही; निधी गेला कुठे?
बाराव्या शतकातील हे ऐतिहासिक मंदिर बघण्यासाठी दररोज देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. मात्र, या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटकांसाठी एकही स्वच्छतागृह उपलब्ध नाही. लांबचा प्रवास करून येणाऱ्या पर्यटकांचे यामुळे कमालीचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, मागील अधिवेशनात सरकारने या मंदिरातील सोयी-सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता; मात्र तरीही परिस्थिती जैसे थे असल्याबद्दल पत्रात खेद व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

अस्वच्छतेचे साम्राज्य आणि चोरीची भीती
मंदिर परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचरा साचला आहे. प्लास्टिकच्या वस्तू आणि टाकाऊ कचरा विखुरलेला असल्याने विद्रुपीकरण झाले असून पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्राचीन वास्तूचे मूल्य अथांग आहे. असे असूनही येथे रात्री-अपरात्री सुरक्षेसाठी रक्षक तैनात नाही. त्यामुळे मंदिराच्या प्राचीन कोरीव भागाचे नुकसान होऊन ऐतिहासिक मूर्ती किंवा वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता रंजन ठाकरे यांनी वर्तवली आहे.

पत्रातील प्रमुख मागण्या:
तात्काळ स्वच्छता मोहीम: मंदिर परिसरात तत्परतेने स्वच्छता मोहीम राबवून जागोजागी कचरापेट्या बसवण्यात याव्यात.
सुरक्षारक्षक नियुक्ती: विदेशी पर्यटकांची सुरक्षा आणि वास्तूचे जतन करण्यासाठी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावेत.
सुविधांची पूर्तता: निधीचा योग्य वापर करून पर्यटकांसाठी तातडीने स्वच्छतागृहांची निर्मिती करावी.

पुरातत्व विभागाने या राष्ट्रीय स्मारकाचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले न उचलल्यास नाशिकच्या या ऐतिहासिक सौंदर्याला मोठा धक्का पोहोचू शकतो, अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet.