निदा खान टी.सी.एस. प्रकरण... मुख्य आरोपींच्या जामीन अर्जाबाबत नाशिक कोर्टाचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ मे - संपूर्ण शहरात गाजलेल्या 'निदा खान टी.सी.एस.' प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ अन्सारी, रझा मेमन, आश्विनी चेनानी आणि इतर दोन आरोपींना नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जिल्हा न्यायाधीश क्र. ६ व्ही. व्ही. कठारे यांनी या सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

बचाव पक्षाचा युक्तिवाद:

आरोपींच्या वकीलांनी न्यायालयात असा दावा केला की, आरोपींना अटक करण्याची गरज नव्हती आणि ते तपासात सहकार्य करण्यास तयार होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचे धर्मांतर केलेले नाही किंवा महिलांना त्रास दिलेला नाही, असा युक्तिवाद करत जामिनाची मागणी केली होती.

विशेष सरकारी वकीलांचा कडाडून विरोध:

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडताना आरोपींच्या वकीलांचे सर्व दावे खोडून काढले. आरोपी तपासात सहकार्य करत नसून गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करत होते, म्हणूनच त्यांना रीतसर अटक करण्यात आली, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. "आरोपींनी पीडितांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे घाणेरडे वक्तव्य केले," असा प्रखर युक्तिवाद ॲड. मिसर यांनी केला. मुख्य आरोपी निदा खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपींना सोडल्यास साक्षदारांवर दबाव येण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.

Advertisement

न्यायालयात पीडितेची साक्ष:

या सुनावणीदरम्यान एक पीडित मुलगी स्वतः न्यायालयात हजर होती. तिने तिच्यावर आणि इतर मुलींवर झालेले अत्याचार आणि आरोपींनी त्यांच्या परिस्थितीचा कशा प्रकारे गैरफायदा घेतला, हे न्यायालयासमोर मांडले.

न्यायालयाचा निकाल:

मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेले विविध गुन्हे आणि पुराव्यांची व्याप्ती लक्षात घेता, न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. आरोपींविरुद्ध सक्षम पुरावे असून तपासाच्या या टप्प्यावर त्यांना जामीन देणे योग्य नसल्याचे नमूद करत न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना सहायक सरकारी वकील व्ही. आर. गायकवाड यांनी मदत केली.

Advertisement

Comments

No comments yet.