मुंबई, (प्रतिनिधी) १४ मे - आयपीएल २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भविष्यातील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारत 'अ' संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यातील वनडे ट्राय-सीरिजसाठी युवा आणि आक्रमक खेळाडूंच्या फौजेची घोषणा करण्यात आली आहे. आगामी २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका युवा खेळाडूंसाठी मोठी 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे.
तिलक वर्माकडे नेतृत्व, रियान पराग उपकर्णधार
भारतीय वरिष्ठ संघात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या तिलक वर्माकडे या दौऱ्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर अष्टपैलू रियान पराग उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. या संघात आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा समावेश विशेष लक्षवेधी ठरला आहे.
आक्रमक फलंदाज आणि भेदक गोलंदाजीचा भरणा
संघात फलंदाजीची धुरा प्रियांश आर्य, आयुष बडोनी आणि यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंग यांच्या खांद्यावर असेल. गोलंदाजीमध्ये यश ठाकूर, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंग आणि अर्शद खान यांसारख्या वेगवान गोलंदाजांना त्यांची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
असे असेल मालिकेचे स्वरूप
ही मालिका एक 'ट्राय-सीरिज' असून यात भारत 'अ', श्रीलंका 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' हे तीन संघ सहभागी होतील. प्रत्येक संघ एकमेकांशी दोनदा भिडणार असून गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये २१ जून रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
भारत 'अ' संघ (वनडे मालिका):
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विप्रज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अरशद खान.
ट्राय-सीरिजचे वेळापत्रक (जून २०२६):
तारीख सामना
९ जून भारत 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
११ जून भारत 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान 'अ'
१३ जून अफगाणिस्तान 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
१५ जून भारत 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
१७ जून भारत 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान 'अ'
१९ जून अफगाणिस्तान 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ'
२१ जून अंतिम सामना
वनडे मालिकेनंतर भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' संघांमध्ये दोन बहुदिवसीय (कसोटी) सामने देखील खेळवले जाणार आहेत, ज्यासाठीच्या संघाची घोषणा बीसीसीआयकडून लवकरच केली जाईल.