नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १४ मे - नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या काल प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत बोधचिन्हावरून (लोगो) आता वादाला तोंड फुटले आहे. या लोगोमध्ये वैष्णव आखाड्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्हांचा पूर्णपणे अभाव असल्याचा गंभीर आक्षेप काळाराम मंदिर देवस्थानचे वंशपरंपरागत पुजारी आणि निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी घेतला आहे. "या लोगोमध्ये तातडीने सुधारणा करून वैष्णव चिन्हांचा समावेश करावा, अन्यथा आखाड्यांना मोठा विचार करावा लागेल," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वैष्णव चिन्हांचा विसर पडला?
श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी या लोगोमधील त्रुटींकडे लक्ष वेधताना खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
धनुष्यबाणाचा अभाव: प्रभू रामचंद्रांचे वैशिष्ट्य असलेले 'धनुष्यबाण' हे वैष्णव आखाड्यांचे प्रमुख चिन्ह आहे. नाशिक हे रामायणाशी निगडित असतानाही लोगोमध्ये हे चिन्ह दाखवण्यात आलेले नाही.
अमृत कुंभ आणि सुदर्शन चक्र: कुंभमेळ्याच्या मूळ संकल्पनेशी संबंधित असलेले अमृत कुंभ, सुदर्शन चक्र, गरुड, कुर्म आणि अमृत मंथनाचे चिन्ह या लोगोमध्ये अपेक्षित होते, मात्र त्याचा अभाव दिसून येत आहे.
त्र्यंबकेश्वरच्या चिन्हांचे वर्चस्व: लोगोमध्ये केवळ त्रिशूल आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे, मात्र वैष्णव आखाड्यांच्या प्रतिनिधित्वाचा विसर पडला असल्याचे महाराजांनी म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये नाशिकऐवजी काशीचे चित्रण?
लोगोसोबतच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत व्हिडिओवरही सुधीरदास महाराजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या व्हिडिओमध्ये नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरच्या वैशिष्ट्यांऐवजी 'काशीच्या घाटाचे' चित्रण दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. "कुंभमेळा नाशिकचा असताना येथे नाशिकच्या संस्कृतीचे दर्शन घडणे अपेक्षित होते," असे त्यांनी नमूद केले.
'तर' वैष्णव आखाडे विचार करतील!
"धनुष्यबाण आणि इतर वैष्णव चिन्हांचा समावेश या बोधचिन्हात व्हायला हवा. तसे न झाल्यास वैष्णव आखाड्यांना या संदर्भात वेगळा विचार करावा लागेल," असा सूचक इशारा महाराजांनी सरकारला दिला आहे. या भूमिकेमुळे आता प्रशासनाकडून लोगोमध्ये काही बदल केले जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.