कुंभमेळ्यासाठी १३ आखाड्यांना मिळणार प्रत्येकी इतक्या कोटींचा निधी... मुख्यमंत्र्यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 14-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १४ मे - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या भव्य आयोजनासाठी राज्य सरकारने तिजोरीचे दरवाजे उघडले आहेत. आखाड्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रति आखाडा ५ कोटी रुपयांचा निधी आणि छोट्या संस्थांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, कुंभमेळ्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधू-महंतांशी संवाद साधून विविध घोषणा केल्या.

आखाड्यांसाठी महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आखाड्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहत खालील निर्णय जाहीर केले आहेत:

वीज देयके: आखाड्यांच्या वीज देयकांची अदायगी कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाईल.

जमीन संपादन: आखाड्यांची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास त्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल.

स्वच्छ गोदावरी: मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी गोदावरी नदीचे अत्यंत स्वच्छ आणि पवित्र स्वरूप भाविकांना पाहायला मिळेल, यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर कॉरिडॉर आणि दर्शन पथ

त्र्यंबकेश्वर येथील विकासकामांसाठी ६६५ कोटी रुपयांच्या 'दर्शन पथ' प्रकल्पाचे ई-भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

Advertisement

शिव दर्शन संकुल: ९,००० भाविकांची क्षमता असलेले वातानुकूलित संकुल उभारले जाईल.

तंत्रज्ञानाचा वापर: एआय-आधारित (AI) गर्दी व्यवस्थापन आणि ५ मिनिटांत आपत्कालीन बाहेर पडण्याची (Exit) व्यवस्था यात असेल.

स्थापत्य शैली: मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात पारंपारिक मराठा शैलीत केले जाणार आहे.

सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नको: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. "भाविकांची सुरक्षा आणि सुविधांबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्यासाठी सध्या ३७७ एकर जमीन आरक्षित असून आखाड्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त जमिनीबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कायमस्वरूपी विकासकामांवर भर

हे नियोजन केवळ २०२७ च्या कुंभमेळ्यापुरते मर्यादित नसून, पुढील १२ वर्षांचा विचार करून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये स्थायी स्वरूपाची विकासकामे केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमधील कुंड, रामकाल पथ आणि मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जात असून संपूर्ण परिसरात अध्यात्म पूरक वातावरण निर्माण केले जात आहे.

या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे यांच्यासह १३ आखाड्यांचे महंत व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.