नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १३ मे - जागतिक बँक सहायित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पांतर्गत (महास्ट्राइड) नाशिक जिल्हा मूल्यांकन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीपूर्वी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांची पाहणी केली. नाशिकमध्ये सुरू असलेली कामे केवळ राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सीमा व्यास यांनी यावेळी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा, सीमा व्यास, ‘महास्ट्राइड’चे महाव्यवस्थापक दीपक देशमुख आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रस्ते, रेल्वे आणि विमानतळ सक्षमीकरणाद्वारे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. नाशिक जिल्हा कृषी, औद्योगिक आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असून, आगामी काळात नाशिक हे वाढवण बंदराशी जोडले जाणार आहे. तसेच निफाड येथील ड्राय पोर्ट आणि रिंग रोडच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर
जिल्ह्यात आध्यात्मिक आणि निसर्ग पर्यटनाला मोठी संधी असून त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि नियोजित बिबट सफारी यांसारख्या उपक्रमांमुळे पर्यटनाला गती मिळेल. गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, विकासकामे करताना जागतिक बँकेने केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी विकासकामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. यावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, कामगारांना सर्व प्रकारची सुरक्षा साधने पुरविली जातील आणि त्याची खात्री कामगार आयुक्तांमार्फत केली जाईल.