राज्यातील कामगारांसाठी १८ नवीन 'ईएसआय' रुग्णालये... या तीन शहरात मेडिकल कॉलेज...

Share:
Main Image
Last updated: 13-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ मे - "राज्यातील प्रत्येक विमाधारक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, हे शासनाचे उद्दिष्ट आहे. कर्मचारी राज्य विमा योजनेचा (ESIC) लाभ शेवटच्या कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने अधिक तत्परतेने काम करावे," असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात आयोजित कामगार विभागाच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड आणि विमा महामंडळाच्या प्रादेशिक संचालक अभिलाषा झा यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१८ नवीन रुग्णालयांना मंजुरी

कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा निवासस्थानाजवळ तातडीने उपचार मिळावेत, यासाठी केंद्राच्या माध्यमातून राज्यात १८ नवीन रुग्णालये मंजूर करण्यात आली आहेत. ही रुग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य शिक्षणालाही मिळणार चालना

तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी अंधेरी (मुंबई), पुणे आणि नागपूर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. ही महाविद्यालये कामगारांच्या आरोग्य सुविधेचा मोठा आधार ठरतील, असा विश्वास ॲड. फुंडकर यांनी व्यक्त केला.

Advertisement

मोबाईलवर मिळणार जवळच्या रुग्णालयाची माहिती

केवळ सुविधा असून चालणार नाही, तर त्याची माहिती कामगारांना असणे आवश्यक आहे. यासाठी आता प्रत्येक विमाधारक कामगाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर जवळच्या रुग्णालयाची आणि उपलब्ध सुविधांची माहिती 'एसएमएस'द्वारे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भविष्यातील आव्हानांसाठी सज्जता

सध्या राज्यात सुमारे ४९ लाख विमाधारक कामगार आहेत. मात्र, नवीन कामगार कायद्यांनंतर ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हा वाढता ताण लक्षात घेऊन आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विस्तारासाठी यंत्रणेने आतापासूनच सज्ज व्हावे, असे आवाहन मंत्र्यांनी केले. "कामगारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.