नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १३ मे - जर तुम्ही लग्नसराईसाठी सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. केंद्र सरकारने अर्थ मंत्रालयामार्फत अधिसूचना जारी करून सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंच्या आयात शुल्कात (Import Duty) मोठी वाढ केली आहे. नवे सुधारित दर आजपासून म्हणजेच १३ मे पासून लागू झाले आहेत.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर तात्काळ कार्यवाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी 'काटकसर' करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी वर्षभर सोने खरेदी आणि अनावश्यक परदेश दौरे टाळावेत, असे मोदींनी म्हटले होते. या आवाहनानंतर अवघ्या काही तासांतच अर्थ मंत्रालयाने कर वाढीचा निर्णय घेतला आहे.
कराची नवी गणितं काय?
जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात कमी केलेले शुल्क आता पुन्हा वाढवण्यात आले आहे.
शुल्क प्रकार जुना दर (जुलै २०२४ पासून) नवीन दर (१३ मे २०२६ पासून)
मूलभूत आयात शुल्क (BCD) ५% १०%
AIDC (उपकर/सेस) १% वाढीव दराने लागू
एकूण परिणाम सुमारे ६% १०% पेक्षा जास्त
UAE सोन्यावरही परिणाम: संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) ठराविक कोट्याअंतर्गत सवलतीच्या दरात येणाऱ्या सोन्यावरील शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
बारीक वस्तूंवरही कर: केवळ सोन्याची बिस्किटेच नव्हे, तर दागिने बनवण्यासाठी लागणारे हुक, पिन, स्क्रू आणि जुन्या धातूंच्या कचऱ्यातून मिळणाऱ्या सोन्यावरही आता १०% कर भरावा लागेल.
तुमच्यावर काय परिणाम होणार?
१. दागिने महागणार: आयात शुल्क वाढल्याने सराफा व्यापाऱ्यांचा खरेदी खर्च वाढेल, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किरकोळ किमतीत मोठी वाढ होईल.
२. गुंतवणूकदारांना फटका: जे लोक सोन्यात गुंतवणूक करतात, त्यांना आता अधिक किंमत मोजावी लागेल.
३. औद्योगिक खर्च वाढणार: ज्या उद्योगांमध्ये मौल्यवान धातूंचा वापर होतो, त्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.
सरकारचा मुख्य उद्देश: 'परकीय चलन साठवण'
देशाच्या परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करणे हा या निर्णयाचा मुख्य हेतू आहे. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासोबतच सोन्याची आयात कमी व्हावी, जेणेकरून डॉलरचा बाहेर जाणारा ओघ थांबवता येईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.