येवलेकरांनो काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आवाहन...

Share:
Main Image
Last updated: 12-May-2026

येवला, (प्रतिनिधी) १२ मे - येवला-लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी येवला दौऱ्यादरम्यान शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चार दिवसाआड पाणीपुरवठ्याची माहिती घेत आज गंगासागर तलाव येथे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत भेट दिली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना उन्हाळ्यात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील, यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करून नागरिकांना कमीत कमी अडचणींना सामोरे जावे लागेल, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार देण्यात आले.

Advertisement

यंदा 'अल निनो'च्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर होण्याची शक्यता आहे  त्यामुळे राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याचा परिणाम पाणीसाठ्यांवर होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत राज्यस्तरीय बैठक घेत आगामी काळात सर्वच शहरे आणि तालुक्यांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा  सुरू राहावा यासाठी काटेकोर नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करत पाणीपुरवठा करावा अश्या सूचना  दिल्या होत्या.मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पाणी कपात सुरू झालेली आहे.  

त्यानुसारच येवला शहरात नियोजनबद्ध पाणी कपात होणे ही परिस्थितीच्या दृष्टीने स्वाभाविक बाब आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेऊन  प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले. 

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिलीपअण्णा खैरे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मुख्याधिकारी तुषार आहेर, बांधकाम सभापती शंकर मांजरे, शहराध्यक्ष दत्ता निकम, सुनील पैठणकर, नितीन गायकवाड, सुनील काबरा, देविदास निकम, मकरंद सोनवणे  यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपास्थित होते.

Comments

No comments yet.