पुणे, (प्रतिनिधी) ११ मे - "राज्यात येत्या जुलै महिन्यापासून 'लँड टायटलिंग ॲक्ट' लागू केला जाणार असून, असा क्रांतिकारी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही 'निश्चित प्रॉपर्टी' म्हणून ओळखली जाईल आणि जगातील कोणत्याही देशात ती कॅश (रोख) करता येईल," अशी महत्त्वाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार भीमराव तापकीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महसूल विभागात डिजिटल क्रांती
मंत्री बावनकुळे यांनी महसूल विभागातील बदलांची माहिती देताना सांगितले की, आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची गरज उरलेली नाही. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, नागपूर येथे भारती विद्यापीठाच्या विस्तारासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
ए.आय. (AI) धोरणासाठी १५०० कोटींचे करार
राज्यातील तंत्रज्ञान विकासाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "शिक्षणाशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणांतर्गत १५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. सध्या दीड लाख विद्यार्थ्यांना ए.आय. तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात असून, आगामी काळात सर्वच विद्यापीठांनी हे तंत्रज्ञान स्वीकारणे अनिवार्य आहे."
मराठी शाळा आणि संस्कारांची गरज - दादाजी भुसे
शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शिक्षणासोबतच संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. "मराठी भाषेबद्दल केवळ भावना व्यक्त न करता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे," असे सांगत त्यांनी भारती विद्यापीठाला सामान्य व गरीब विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे 'शिक्षण मॉडेल' तयार करण्याचे आवाहन केले.
राजदीप सरदेसाई यांना 'पतंगराव कदम स्मृती पुरस्कार'
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना मान्यवरांच्या हस्ते 'दुसरा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यापीठातील संशोधक व गुणवंत कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
एका क्लिकवर जमीन आणि मालमत्तेचे अधिकार सुनिश्चित करणारा हा कायदा राज्याच्या महसूल इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे.
?s=20