नाशिक, (प्रतिनिधी) ९ मे - शहरातील आडगाव नाका परिसरात शनिवारी (९ मे) मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच मित्राने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
नेमकी घटना काय?
मयत जयवंत यशवंत पवार (४५, रा. अमरधाम रोड, जुने नाशिक) हे शनिवारी पहाटे ३:३० च्या सुमारास आडगाव नाका येथील 'मधुरमिलन स्वीट्स' दुकानासमोर त्यांचे मित्र विनोद आगळे ऊर्फ वस्ताद यांच्यासोबत उभे होते. यावेळी त्यांचा दुसरा मित्र संशयित आरोपी राजा काकवीपुरे तेथे आला. त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली, ज्याचे रूपांतर वादात झाले.
छातीजवळ केला वार
रागाच्या भरात संशयित राजा काकवीपुरे याने त्याच्याजवळील चाकूने जयवंत पवार यांच्या उजव्या हाताच्या बगलेखाली छातीजवळ जोरात वार केला. हा वार वर्मी लागल्याने पवार गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी मयत जयवंत यांची पत्नी गिता जयवंत पवार (३५) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३५१(३), ३५२ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सतिष जगदाळे करत आहेत. भरवस्तीत आणि मध्यरात्री झालेल्या या हत्येमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.