नाशिक, (प्रतिनिधी) ८ मे - हृदयविकाराचे नाव काढताच रुग्णांच्या मनात धडकी भरते, मात्र नाशिकच्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलने आपल्या निष्णात वैद्यकीय सेवांच्या जोडीने हा प्रवास सुसह्य केला आहे. डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील हृदयविकार शस्रक्रिया विभागाने गेल्या १० वर्षांत तब्बल ४ हजार ८६९ क्लिष्ट शस्रक्रियांचा यशस्वी टप्पा पूर्ण करून उत्तर महाराष्ट्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
गुंतागुंतीच्या शस्रक्रियात दबदबा
केवळ बायपासच नव्हे, तर या विभागात १ हजार २६१ वॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि रिपेअर शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी धोक्याची पातळी सर्वाधिक असते अशा ६२ 'री-डू' (दुसऱ्यांदा होणाऱ्या) कार्डियाक सर्जरी आणि ४७ कार्डियाक ट्युमर (हृदयातील गाठी) वरील अत्यंत जोखमीच्या शस्रक्रिया येथे यशस्वी झाल्या आहेत. रोटा आणि आयव्हीयूएस (IVUS) सारख्या अत्याधुनिक उपकरणांमुळे बायपासची भीती असलेल्या रुग्णांवर 'कॉम्प्लेक्स अन्जिओप्लास्टी' करणेही आता सहज शक्य झाले आहे.
'पिन-होल' सर्जरी : आधुनिक युगाचे वरदान
आजच्या धावपळीच्या युगात रुग्णांना लवकर बरे व्हायचे असते. हे ओळखून डॉ. सिन्हा यांनी 'पिन-होल' (MICS) सर्जरीवर भर दिला आहे. गेल्या सहा महिन्यात ९२ अशा शस्रक्रिया करण्यात आल्या. यात छातीवर मोठी चीर देण्याची गरज नसते, रक्तस्त्राव कमी होतो आणि रुग्ण काही दिवसांतच कामावर परतू शकतो. अविवाहित तरुणी आणि बालकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
बालहृदयावरील उपचारात संजीवनी
हृदयात छिद्र असलेल्या किंवा जन्मतः दोष असलेल्या १ हजार १५५ बालकांवर येथे ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आणि रविवारी सुमारे ३० ते ३५ बालकांवर 'डिव्हाईस क्लोजर' प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे अनेक चिमुकल्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे.
शासकीय योजनेचा भक्कम आधार
गोरगरीब रुग्णांसाठी एसएमबीटी हे वरदान ठरले आहे. येथील बहुतांश शस्रक्रिया 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत पूर्णपणे मोफत केल्या जातात. योजनेत न बसणाऱ्या रुग्णांसाठीही ऑपरेशन, डॉक्टर आणि नर्सिंग चार्जेस मोफत असून, केवळ औषधांच्या खर्चात उपचार केले जातात, अशी माहिती आरोग्यसेवा संचालक सचिन बोरसे यांनी दिली.
तज्ज्ञांचे मत
"आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियेनंतरची विशेष काळजी (Post Operative Care) यामुळे आमच्याकडे रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण अत्यंत समाधानकारक आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक गरजूला जागतिक दर्जाचे उपचार मिळावेत, हेच आमचे उद्दिष्ट आहे."
- डॉ. विद्युतकुमार सिन्हा (प्रख्यात हृदयविकार शस्रक्रिया तज्ज्ञ)