मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ७ मे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी नुकताच आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता राष्ट्रवादीतर्फे कुणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या या एका जागेसाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि माजी खासदारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हे आहेत प्रमुख दावेदार
राज्यसभेसाठी सध्या चार माजी खासदारांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत:
१. आनंद परांजपे
२. सुबोध मोहिते
३. शिवाजीराव आढळराव पाटील
४. संजय काका पाटील
यांच्यासह पक्षातील दिग्गज भुजबळ आणि मलिक कुटुंबीयांतूनही या जागेसाठी दावेदारी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
पार्थ पवारांचा शब्द ठरणार निर्णायक?
पक्षात खासदार पार्थ पवार यांच्या शब्दाला मोठे वजन असून, त्यांनी अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांच्या नावासाठी आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे राज्यसभेच्या रिंगणात तरुणांना संधी मिळते की अनुभवाला प्राधान्य दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
रिक्त पदांचाही पेच सुटणार?
केवळ राज्यसभाच नव्हे, तर पक्षात अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदांबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत:
महिला प्रदेशाध्यक्ष: या पदासाठी वैशाली नागवडे, रूपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत आहेत.
महिला आयोग: प्रतिभा शिंदे, ज्योती मेटे आणि वैशाली मोटे यांनी या पदासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबई अध्यक्ष: सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे या दोन्ही कार्याध्यक्षांची नावे मुंबई अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत.
युवक प्रदेशाध्यक्ष: सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर १० महिन्यांपासून हे पद रिक्त असून, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
देवगिरीवर कार्यकर्त्यांची गर्दी
'लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, मात्र राष्ट्रवादीतील पदांच्या गाठी देवगिरीवर बांधल्या जातात' ही म्हण सध्या पक्षात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विविध पदांसाठी इच्छुक नेत्यांची शिष्टमंडळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेण्यासाठी 'देवगिरी' निवासस्थानी चकरा मारत आहेत. आता या पदांचा फैसला कधी होतो, याकडे कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.