नाशिक, (प्रतिनिधी) ७ मे - मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन संशयितांनी मायलेकासह त्यांच्या भावजयीला बेदम मारहाण केल्याची घटना आनंदवली भागात घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेच्या कपाळावर लोखंडी कड्याने प्रहार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून, गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल किशोर कऱ्हेकर (१९) व दीपक सीताराम धुमाळ (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मी उर्फ राणी भगवान शिंदे (रा. सप्तशृंगी मंदिराजवळ, आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी रात्री राणी शिंदे यांचा मुलगा समीर याला मारहाण झाली होती. या मारहाणीबाबत विचारणा करण्यासाठी शिंदे या गल्लीत उभ्या असलेल्या मुलांकडे गेल्या होत्या. यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन साहिल कऱ्हेकर याने राणी यांची भावजय सुनीता यांच्या कपाळावर हातातील लोखंडी कड्याने जोरदार प्रहार केला. यामध्ये त्या रक्तबंबाळ झाल्या. सुनीता यांना वाचवण्यासाठी राणी शिंदे आणि त्यांचा मुलगा समीर धावून गेले असता, संशयितांनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास हवालदार ढमाले करत आहेत.
नाशिक : चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६९ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मधुकर नथा वाघ (रा.महादेव रो हाऊस,मारूती संकुल दत्तनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघ कुटूंबिय सोमवारी (दि.४) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली तीन हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६९ हजाराचा ऐवज चोरून नेला. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.