नाशकात १३ हजार कोटींचे सामंजस्य करार... ३२ हजार युवकांना रोजगार... मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्योग परिषद...

Share:
Main Image
Last updated: 06-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ मे - "नाशिक हे केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र नसून, ते आता महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन बनले आहे. क्षमता आणि प्रगत सुविधांमुळे नाशिकचा विकास आता कोणीही रोखू शकणार नाही," असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये आयोजित 'कुंभ उद्योग संगम' आणि 'गुंतवणूक शिखर परिषदे'च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

१३ हजार कोटींचे ऐतिहासिक करार

या परिषदेत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत ३०० हून अधिक उद्योजकांसोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या गुंतवणुकीतून नाशिक आणि परिसरात तब्बल ३२ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या दोन वर्षांत नाशिकसाठी एकूण ५७ हजार कोटींची गुंतवणूक आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल कुंभ आणि ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था

२०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो 'डिजिटल कुंभ' असेल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्य शासन कुंभमेळ्यासाठी ३३ हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. या पायाभूत सुविधांमुळे पुढील १० वर्षांत नाशिक जिल्ह्याची अर्थव्यवस्था ३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल." रिंग रोड, ड्राय पोर्ट आणि विमानतळ विस्तारामुळे नाशिक हे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होत आहे.

नवीन एमआयडीसी आणि उद्योगांचे आकर्षण

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी माहिती दिली की, नाशिकमधील इगतपुरी, राजूर बहुला आणि मनमाड येथे नवीन एमआयडीसी साकारण्यात येत आहेत. यासाठी १३०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स आणि एल अँड टी यांसारखे मोठे समूह नाशिकमध्ये आपला विस्तार करण्यास इच्छुक आहेत.

उत्तर महाराष्ट्र ठरणार 'ग्रोथ इंजिन'

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "राज्य सरकारने केवळ मुंबई-पुणे केंद्रित विकास न ठेवता जिल्ह्यांना विकासाचे केंद्र बनवले आहे. नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे आता उद्योगांचे नवे मॅग्नेट ठरत आहेत."

या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, उदय सामंत, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उत्तर महाराष्ट्रातील विकासकामांचे सादरीकरण केले.

Advertisement

आकडे बोलतात...

गुंतवणूक: १३,१९० कोटी रुपये (३००+ उद्योजक).

रोजगार निर्मिती: ३२,००० प्रत्यक्ष रोजगार.

दावोस परिषद: नाशिकसाठी १२,००० कोटींची स्वतंत्र तरतूद.

पायाभूत सुविधा: ३३,००० कोटींचे कुंभमेळा विकास प्रकल्प.

लक्ष्य: १० वर्षांत ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था.

एकूण सामंजस्य करार : ३१४

एकूण गुंतवणूक : १४०१५.८८ कोटी

रोजगार निर्मिती : ३५८५७

Comments

No comments yet.