नाशिकमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद... भररस्त्यात फळ व्यापाऱ्याची लूट, तर मुलावर 'फायटर'ने हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 06-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ मे - शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिंडोरी रोडवर एका फळ व्यापाऱ्याला कार अडवून बेदम मारहाण करत २० हजारांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे, तर दुसरीकडे पंचवटी भागात एका १७ वर्षीय मुलावर विनाकारण लोखंडी 'फायटर'ने हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटना १: भररस्त्यात कार अडवून लुटमार

मिळालेल्या माहितीनुसार, सतिश ब्रिगुनाथ गुप्ता (रा. कर्णनगर, पेठरोड) हे फळ खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी (दि. ५) रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास ते गुजरातहून आपल्या कारने (MH 15 KU 4167) घरी परतत होते.

दिंडोरी रोडवरील जुडीओ शॉपिंग मॉल भागात पाठीमागून आलेल्या एका फोक्सवॅगन पोलो कारमधील चौघांच्या टोळक्याने गुप्ता यांची कार ओव्हरटेक करून अडवली. काही समजण्याच्या आतच टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत कारबाहेर खेचले. गुप्ता यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या चेहऱ्यावर बोथट हत्याराने वार करून जखमी केले. यानंतर टोळक्याने त्यांच्या खिशातील २० हजार रुपयांची रोकड हिसकावून घेत पोबारा केला. म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक क्षिरसागर तपास करत आहेत.

Advertisement

घटना २: १७ वर्षीय मुलावर 'फायटर'ने हल्ला

दुसऱ्या घटनेत, मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल परिसरात एका अल्पवयीन मुलाला विनाकारण लक्ष्य करण्यात आले. तेजस रमेश वाघमारे (१७, रा. पेठरोड) हा रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निलकमल स्वीट्सजवळ उभा होता.

त्यावेळी ३ ते ४ जणांच्या टोळक्याने त्याला गाठले आणि कुठलेही कारण नसताना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. या हल्ल्यात एका संशयिताने तेजसच्या डोक्यात लोखंडी फायटर मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली असता, लोक जमा होण्याच्या भीतीने टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हवालदार आहिरे अधिक तपास करत आहेत.

पोलीस प्रशासनासमोर आव्हान

शहरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः पेठरोड आणि दिंडोरी रोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे रात्रीचा प्रवास असुरक्षित होत असल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments

No comments yet.