प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’... एकाच दिवसात रोखले तब्बल ९ बालविवाह...

Share:
Main Image
Last updated: 05-May-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ५ मे - जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात बालविवाहाची मोठी अनिष्ट प्रथा रोखण्यात यश आले आहे. रविवार, ३ मेच्या मुहूर्तावर होणारे तब्बल ९ बालविवाह प्रशासनाने एकाच दिवसात थांबवून अल्पवयीन मुलींचे भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचवले आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाईचा बडागा

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ३ मे २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विविध तालुक्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून हे विवाह रोखण्यात आले.

कुठे किती विवाह थांबवले?

नगर शहर: ३ विवाह

नगर तालुका: १ विवाह

अकोले: १ विवाह

Advertisement

राहुरी: १ विवाह

श्रीगोंदा: १ विवाह

पाथर्डी: १ विवाह

नेवासा: १ विवाह

यंत्रणांचा चोख समन्वय

ही कारवाई केवळ एका विभागाची नसून, यात पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष आणि 'चाईल्ड हेल्पलाईन' कक्ष यांनी एकमेकांच्या समन्वयाने काम केले. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहचून प्रशासनाने पालकांचे समुपदेशन केले आणि कायद्याचा धाक दाखवत हे लग्न सोहळे थांबवले.

"बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. समाजाने या प्रथेविरुद्ध एकत्र येणे गरजेचे आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला देऊन सहकार्य करावे."

— प्रशासन, महिला व बालविकास विभाग.

Comments

No comments yet.