नागपूर, (प्रतिनिधी) ३ मे - पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला यमसदनी पाठवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. "अशा गुन्हेगारांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मलाही वाटते; मात्र लोकशाही कायद्याने चालते," अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा खटला अत्यंत वेगाने (Fast Track) चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
पीडित वडिलांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुख्यमंत्री नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, "मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असलेला रोष रास्तच आहे. कोणत्याही तांत्रिक त्रुटीचा फायदा आरोपीला मिळू नये, यासाठी सरकार न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडेल. तपासातील वेग आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत प्रशासनाने पीडित कुटुंबाला लेखी आश्वासनही दिले आहे."
तपासातील जुन्या उणिवांची होणार चौकशी
सदर आरोपीवर २०१९ मध्येही गुन्हा दाखल झाला होता, मात्र तो पुराव्याअभावी सुटला होता. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "त्यावेळी तपासात काही उणिवा (Lapses) राहिल्या होत्या का, याची चौकशी केली जाईल. तसेच यावेळेस त्याचे जुने गुन्हे शोधून काढून, तो कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे."
राजकारण्यांवर ओढले ताशेरे
घटनेच्या ठिकाणी काही लोक परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता तिला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपही त्यांनी केला. "काही लोक पीडितेच्या वडिलांनाही अडवण्याचा प्रयत्न करत होते, ते कोण आहेत हे आम्हाला समजले आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
राहुल गांधींवर कडाडून टीका
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. "महिला आरक्षण विधेयकावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. काँग्रेसने महिला आरक्षणाविरोधात नेहमीच प्रतिगामी निर्णय घेतले असून, आपल्या संख्याबळाच्या जोरावर आरक्षणाला विरोध केला होता," असा टोलाही त्यांनी लगावला.