नाशिकचा रामकृष्ण घोष IPL मध्ये चमकला... थेट सूर्यकुमार यादवलाच बाद केला... दमदार पदार्पणाची सर्वत्र चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 03-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ मे - नाशिकच्या क्रीडा विश्वासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. नाशिकचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोष याने आयपीएल २०२६ मध्ये 'चेन्नई सुपर किंग्स' (CSK) कडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध आपले पदार्पण केले. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) पार पडलेल्या या सामन्यातून रामकृष्णने जागतिक क्रिकेटच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर पहिले पाऊल ठेवले आहे. शनिवारी चेन्नई आणि मुंबई यांच्यात सामना झाला. त्यात रामकृष्ण घोषने चमकदार कामगिरी केली. त्याने मुंबईच्या सूर्यकुमार यादवचा बळी घेतला. त्याने एकूण ३ षटके टाकली. त्यात २४ धावा देऊन १ बळी घेतला.

विजय हजारे ट्रॉफीतील ‘तो’ ऐतिहासिक स्पेल

रामकृष्णच्या या निवडीमागे त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी कारणीभूत आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने गोव्याविरुद्ध अखेरच्या षटकांमध्ये (४८ व्या आणि ५० व्या षटकात) सलग निर्धाव (Maiden) षटके टाकण्याचा दुर्मिळ पराक्रम केला होता. त्याच्या या अचूक यॉर्कर्स आणि कटर चेंडूंच्या जोरावर त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

ऋतुराजचा विश्वास आणि धोनीचे मार्गदर्शन

रामकृष्णने आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दिले आहे. "ऋतुराज मैदानात खूप शांत असतो आणि गोलंदाजांना पूर्ण स्वातंत्र्य देतो," असे रामकृष्णने एका मुलाखतीत सांगितले. तसेच, गेल्या वर्षी खेळण्याची संधी मिळाली नसली तरी संघात राहून महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून मिळवलेले धडे आता मैदानात कामी येत असल्याचे त्याने नमूद केले.

Advertisement

वडिलांचे स्वप्न आणि १६ व्या वर्षी घेतलेला निर्णय

रामकृष्ण हा 'लेट ब्लूमर' (उशिरा संधी मिळालेला) खेळाडू मानला जातो. त्याचे वडील स्वतः महाराष्ट्राचे माजी रणजी वेगवान गोलंदाज आणि त्याचे पहिले प्रशिक्षक आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी वडिलांनी विचारले, 'अभ्यास की क्रिकेट?', तेव्हा रामकृष्णने बॅट आणि चेंडू निवडला. १० वीची परीक्षा बाह्य विद्यार्थी म्हणून देऊन त्याने आपला पूर्ण वेळ मैदानावर घालवला, ज्याचे फळ आज त्याला मिळाले आहे.

केवळ गोलंदाज नाही, तर स्फोटक फलंदाज

रामकृष्ण केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही कमाल करतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईविरुद्ध अवघ्या २७ चेंडूंत नाबाद ६४ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. "जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा स्वतःला फलंदाज समजतो आणि गोलंदाजी करताना पूर्णपणे गोलंदाज असतो," अशा सोप्या मंत्राचा वापर तो मैदानात करतो.

नाशिकमधील त्याच्या क्लबमधील सहकारी आणि प्रशिक्षकांकडून रामकृष्णवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आयपीएलमधील या पदार्पणानंतर आता तो भारतीय संघाचे तिकीट कधी मिळवतो, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.