नाशिकमध्ये मुलांच्या अपहरणाचे सत्र? ५ चिमुरडे गायब झाल्याने पालकांमध्ये अस्वस्थता...

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ मे - नाशिक शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या ४८ तासांत वेगवेगळ्या भागांतील पाच मुले गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. या सर्व मुलांना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आडगाव परिसरातून दोघे बेपत्ता

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजी रोडवरील निलगिरीबाग परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी २९ एप्रिलपासून बेपत्ता आहे. तर, लक्ष्मीनारायण फेस्टिवल लॉन्स भागातील एक मुलगा ३० एप्रिलपासून गायब आहे. या दोन्ही प्रकरणांत अपहरणाचा संशय असून हवालदार देवरे व पाटील तपास करीत आहेत.

बालगृहातून मुलगा गायब

Advertisement

उंटवाडी येथील मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहात वास्तव्यास असलेला एक मुलगा मंगळवारी (३० एप्रिल) सकाळपासून बेपत्ता झाला आहे. परिसरात सुकण्यासाठी टाकलेले कपडे काढत असताना तो अचानक गायब झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून उपनिरीक्षक निसार शेख अधिक तपास करत आहेत.

जायभावे नगर आणि जेलरोडमध्येही खळबळ

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जायभावे नगर (गामणे ग्राउंड परिसर) येथील १४ वर्षीय मुलगी मंगळवारपासून बेपत्ता आहे. दुसरीकडे, नाशिकरोड पोलीस ठांतर्गत जेलरोड-पंचक भागातील एका अल्पवयीन मुलीस जय संजय दुबे (रा. शिवाजीनगर) या संशयिताने पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही प्रकरणांत अनुक्रमे हवालदार तळपाडे आणि भोळे तपास करीत आहेत.

पालकांनो, सजग राहा!

एकामागून एक पाच मुले बेपत्ता झाल्याने शहरात मानवी तस्करी किंवा संघटित टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी शहरात नाकाबंदी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.