इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही विवाह... १०० एकरवर भव्य मांडव... चर्चा तर होणारच...

Share:
Main Image
Last updated: 02-May-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २ मे - आपल्या खुसखुशीत कीर्तनशैलीने समाजप्रबोधन करणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा उद्या, ३ मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे पार पडणार आहे. साखरपुड्यापासूनच चर्चेत असलेल्या या विवाह सोहळ्यासाठी तब्बल १०० एकर परिसरात भव्य व्यवस्था करण्यात आली असून, हा सोहळा राज्याचा लक्षवेधी कार्यक्रम ठरणार आहे.

राजकीय व धार्मिक दिग्गजांचा मेळावा

या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, आजी-माजी आमदार आणि खासदार यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांसोबतच महाराष्ट्रातील विविध वारकरी संप्रदायातील संत-महंत आणि कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लाखो भाविक आणि पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडूनही खबरदारी घेतली जात आहे.

विवाह सोहळ्याला धार्मिक जोड

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा विवाह पार पडणार आहे, त्याच ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला लग्नाचा थाट आणि दुसऱ्या बाजूला भक्तीचा मळा, अशा मंगलमयी वातावरणात हा सोहळा रंगणार आहे.

Advertisement

टीकाकारांना ‘रोखठोक’ उत्तर

गेल्यावर्षी ज्ञानेश्वरी यांचा साखरपुडा अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला होता. "लग्ने साधी करा," असा उपदेश देणारे महाराज स्वतः मात्र भव्य कार्यक्रम करतात, अशी टीका सोशल मीडियावर झाली होती. या टीकेमुळे काही काळ व्यथित झालेल्या महाराजांनी कीर्तन सोडण्याचे संकेतही दिले होते. मात्र, त्यानंतर एका कीर्तनात त्यांनी टीकाकारांना थेट आव्हान देत, "लेकीचं लग्न आणखी जोरात करणार, काय बोंबलायचंय ते बोंबला," असे ठामपणे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. "राजकीय सभांवर होणाऱ्या खर्चावर कोणी का बोलत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

प्रशासनाची आणि कार्यकर्त्यांची धावपळ

१०० एकर परिसरात उभारण्यात आलेला मांडव, भोजन व्यवस्था आणि पार्किंगसाठी केलेली जय्यत तयारी पाहता, हा सोहळा एखाद्या भव्य संमेलनासारखा वाटत आहे. संगमनेर तालुक्यात या निमित्ताने मोठी गर्दी होणार असल्याने वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे.

आता उद्या होणाऱ्या या विवाह सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, इंदुरीकर महाराजांच्या या 'शाही' निर्णयाची पुन्हा एकदा चर्चा रंगणार, हे निश्चित!

Comments

No comments yet.