येवला, (प्रतिनिधी) १ मे - छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान आणि शौर्याचा आदर्श निर्माण केला. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवून समाजातील अंधकार दूर केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवला.या महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" एक महत्वपूर्ण संदेश दिला. त्यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. मायबोली कर्ण बधिर शैक्षणिक संस्था येवला येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहण मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रा.अर्जुन कोकाटे, अध्यक्ष दिनकर दाणे, सरचिटणीस सुधाताई पाटील बाबासाहेब कोकाटे, मुख्याध्यापक सलील पाटील, सुखदेव आहेर, हेमंत पाटील, मंदा पडवळ, रेखा दुनबळे, सोनल सोनवणे, अविनाश मांडवडे, प्राचार्य प्रा.समृद्धी मोरे, प्रा.छाया धुळसुंदर, प्रा.अश्विनी मढवई, नितीन कदम, शोभा कदम, रावसाहेब खराटे, विजय जाधव, मारुती पगारे, रावसाहेब सोनवणे यांच्यासह शिक्षण, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. भाषिक आधारे राज्यांची पुनर्रचना करताना असंख्य आंदोलनं, त्याग आणि बलिदानातून महाराष्ट्र घडला. राज्यातील १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला हे स्वप्न साकार करता आले. त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी कृतज्ञतेचा आणि प्रेरणेचा आहे. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून, ती विचारांची भूमी आहे. संतांची परंपरा, समाजसुधारकांचे कार्य आणि शूरवीरांचा इतिहास यामुळे महाराष्ट्र महान बनला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या युगात आपल्या पुढे नवे आव्हान आहेत. तंत्रज्ञान, पर्यावरण, शिक्षण आणि समाजातील बदल. पण या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात आहे. तुमच्यातील प्रत्येकजण हा महाराष्ट्राचा भविष्यातील आधारस्तंभ आहे. तुमच्या ज्ञानाने, प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने तुम्ही महाराष्ट्राला अधिक प्रगत, समृद्ध आणि सशक्त बनवू शकता.
महाराष्ट्राची ओळख केवळ उद्योग, शेती किंवा शिक्षणात नाही, तर मानवतेच्या मूल्यांमध्ये आहे. आपल्याला एकमेकांप्रती आदर, सहिष्णुता आणि बंधुता जपावी लागेल. आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया,आपण चांगले नागरिक बनू, शिक्षणाला प्राधान्य देऊ,समाजासाठी काहीतरी सकारात्मक करू आणि आपल्या महाराष्ट्राचे नाव उंचावू असे त्यांनी सांगितले.