मंत्री नितेश राणेंना दणका... एक महिना जेल, १ लाख रुपयांचा दंड... न्यायालयाचा निकाल...

Share:
Main Image
Last updated: 28-Apr-2026

कणकवली, (प्रतिनिधी) २८ एप्रिल - मुंबई-गोवा महामार्गाच्या अभियंत्यावर चिखलफेक केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने राणे यांना दोषी ठरवत एक महिना कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या निकालाला तात्काळ स्थगिती मिळाल्याने राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून, ते आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

नेमके प्रकरण काय?

ही घटना ४ एप्रिल २०१९ रोजी घडली होती. त्यावेळी नितेश राणे हे आमदार होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत असताना कणकवली शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि चिखलमय झाली होती. यामुळे संतप्त झालेल्या नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतून त्यांना चिखलाने माखले होते. या घटनेचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला होता आणि राणे यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

न्यायालयाचा निकाल आणि कलम

Advertisement

सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर होता. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड विधान कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने केलेला अपमान) अंतर्गत दोषी ठरवले. या प्रकरणात २९ अन्य संशयितांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

?s=20

उच्च न्यायालयात आव्हान देणार

निकालावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांच्या वकिलांनी सांगितले की, "न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आमच्या अर्जानुसार तूर्तास स्थगिती दिली आहे. आम्ही या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करणार आहोत आणि कायदेशीर लढा सुरूच ठेवणार आहोत."

या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता उच्च न्यायालयात या प्रकरणाला काय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

?s=20

Comments

No comments yet.