"खासदारकी फक्त..." "कुणाची तरी जिरवायची होती..." नीलेश लंकेंची खळबळजनक घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 25-Apr-2026

अहिल्यानगर, (विशेष प्रतिनिधी) २५ एप्रिल - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'जायंट किलर' ठरलेले खासदार नीलेश लंके यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. "कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढलो, मात्र २०२९ मध्ये मी पुन्हा पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार," अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, लंके यांनी दिल्लीऐवजी पुन्हा मुंबईत सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार लंके सध्या पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर गटात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या आगामी वाटचालीचा 'प्लॅन' स्पष्ट केला.

'जिरवण्यासाठी' लढलो लोकसभा!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि नीलेश लंके यांच्यातील लढत संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. या संघर्षाचा संदर्भ देत लंके म्हणाले की, "ती निवडणूक कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी (जिरवण्यासाठी) लढविली होती. पण आता २०२९ मध्ये मला पुन्हा विधानसभेच्या माध्यमातून मुंबईत सक्रिय राजकारण करायचे आहे."

Advertisement

कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

कार्यकर्त्यांना बळ देताना लंके यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे आवाहन केले. "ज्या ठिकाणी अन्याय होईल, तिथे संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुकीनंतर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर काम करा," असे ते म्हणाले. स्वतःच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "कार्यकर्ता रेसच्या घोड्यासारखा हवा. मी आजही २०-२० तास काम करतो. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेने कामाला लागा, मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे."

पारनेरवर पुन्हा वर्चस्व मिळवणार?

पारनेर विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे काशिनाथ दाते आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव केला होता. आता स्वतः नीलेश लंके यांनी २०२९ च्या विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यामुळे पारनेरमध्ये पुन्हा एकदा लंके विरुद्ध विरोधक असा मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

खासदार असतानाही पुन्हा आमदारकीची इच्छा व्यक्त केल्याने, लंके यांचे हे पाऊल जिल्ह्याच्या राजकारणात नेमके कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.