नाशिक, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - नाशिक शहरात जबरी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, दुचाकीस्वार भामट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी (दि. २१) शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि एका तरुणाचा मोबाईल असा मिळून सुमारे ३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चालू गाडीवर हिसकावून नेला. याप्रकरणी आडगाव, उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. लग्नावरून परतताना १.८० लाखांचे मंगळसूत्र लंपास
गोविंदनगर येथील नंदिनी महेश जाधव या मंगळवारी छत्रपती संभाजी रोडवरील रुख्मिणी लॉन्स येथे विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. लग्न आटोपून आपल्या कारच्या दिशेने पायी जात असताना, रस्ता ओलांडताना दुचाकीवरून आलेल्या 'डबल सीट' भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाचे (किंमत १ लाख ८० हजार रुपये) मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक योगिता पाटील तपास करत आहेत.
२. बिटको परिसरात वृद्ध महिलेला लक्ष्य
दुसरी घटना नाशिकरोड भागातील म्हसोबा मंदिरामागे घडली. विमल अनिलकुमार जगताप (७४) या आपल्या दोन मुलींसह रात्री नऊच्या सुमारास विवाह सोहळा आटोपून घरी परतत होत्या. शनी मंदिराजवळून पायी जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दुपदरी मंगळसूत्र ओढून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर तपास करत आहेत.
३. 'लंच ब्रेक'मध्ये फिरताना मोबाईल चोरी
तिसरी घटना मुंबई नाका परिसरात घडली. सातपूर येथील रहिवासी हर्षलकुमार बागड हे मुंबई नाका भागात एका खासगी कंपनीत रात्रपाळीत कामाला आहेत. रात्री साडे नऊच्या सुमारास लंच ब्रेक मध्ये ते फोनवर बोलत फेरफटका मारत असताना, साखलाज फर्निचर ते संदीप हॉटेल दरम्यान दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील ४० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.
पोलीस प्रशासनासमोर आव्हान
शहरात एकाच दिवसात घडलेल्या या तीन घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः विवाह सोहळ्यांच्या गर्दीचा आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा चोरटे घेत आहेत. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.