"ॲक्सिस बँकेतही घडले होते लैंगिक शोषणाचे प्रकार"... अमृता फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट...

Share:
Main Image
Last updated: 18-Apr-2026

नागपूर, (प्रतिनिधी) १८ एप्रिल - "नाशिकमधील 'टीसीएस'मधील लैंगिक अत्याचाराची घटना अतिशय क्लेशदायक आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये महिलांसोबत असे प्रकार घडणे ही चिंतेची बाब आहे. मी पूर्वी कार्यरत असलेल्या ॲक्सिस बँकेतही अशा घटना समोर आल्या होत्या, मात्र ‘व्हिसल ब्लोईंग’मुळे वेळीच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती," असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला.

नागरिक विकास समितीतर्फे नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी आयोजित 'नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलना'त त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महापौर नीता ठाकरे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर आणि विजया मारोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

'व्हिसल ब्लोईंग' हे प्रभावी शस्त्र
कॉर्पोरेट जगतातील छळाबाबत बोलताना फडणवीस म्हणाल्या की, "जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा त्या दडपण्याऐवजी तातडीने वरिष्ठांना कळवणे किंवा व्हिसल ब्लोईंगच्या माध्यमातून समोर आणणे आवश्यक आहे. ॲक्सिस बँकेतील अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, तक्रारी झाल्यामुळेच संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल होऊ शकले. महिलांनी अशा प्रकरणांत गप्प न राहता आवाज उठवला, तरच या विकृतीला आळा बसेल."

Advertisement

'लव्ह जिहाद'वर मुलींनी सावध राहावे
परतवाडा येथील कथित सेक्स स्कॅंडल आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. "लव्ह जिहादची प्रकरणे भयावह आहेत. सध्याच्या तरुणाईकडे आपल्या वेद-पुराणांचे आणि संस्कृतीचे पाठबळ नसल्याने ते संभ्रमित आहेत. मुलींनी अधिक सावध राहण्याची गरज असून, आपली भारतीय मूल्यसंस्कृती जोपासली तर अशा संकटांपासून बचाव होऊ शकतो," असे आवाहन त्यांनी केले. तसेच अशोक खरात याने आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून महिलांना जाळ्यात ओढले, त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा समाचार
राजकारणात महिलांचा टक्का वाढण्यासाठी ३३ टक्के आरक्षण अनिवार्य असल्याचे सांगत त्यांनी 'नारी वंदन अधिनियमा'चे समर्थन केले. "काही लोक या आरक्षणाला विरोध करत आहेत, मात्र महिलांना त्यांचा हक्काचा वाटा मिळणे ही काळाची गरज आहे. देशातील महिलांचा या विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments

No comments yet.