नाशिकच्या महिला व १६ वर्षांखालील क्रिकेट संघाची विजयी घोडदौड.. या खेळाडूंची दमदार कामगिरी...

Share:
Main Image
Last updated: 17-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ एप्रिल - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिल्हा संघाच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत चमकदार यश संपादन केले आहे. वरिष्ठ महिला गटात नाशिकने पुणे येथील 'बी व्ही जे' क्लबवर ९७ धावांनी मोठा विजय मिळवला, तर १६ वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकने डी.ए.आर.सी. संघाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेत वर्चस्व गाजवले.

Advertisement

महिला संघ : प्रियांका आणि तेजस्विनीची विजयी चमक
पुण्यात सुरू असलेल्या वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी (इन्व्हिटेशन सुपर लीग) स्पर्धेत नाशिकने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद १८७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. सलामीवीर तेजस्विनी बाटवालने ५२ धावांची संयमी अर्धशतकी खेळी केली, तर कार्तिकी गायकवाडने २३ धावांचे योगदान दिले.

विजयासाठी १८८ धावांचा पाठलाग करताना नाशिकच्या भेदक गोलंदाजीसमोर पुण्याचा 'बी व्ही जे' क्लब अवघ्या २४ षटकांत ९० धावांवर गारद झाला. नाशिकची कर्णधार आणि ऑफ स्पिनर प्रियांका घोडकेने अवघ्या काही धावांत ६ बळी घेत पुण्याचा कणा मोडला. तिला शाल्मली क्षत्रिय व वैभवी बालसुब्रमण्यम यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली.

१६ वर्षांखालील संघ : श्रेयस उगलेचे १२ बळी, मुजतबाचे शतक

दुसरीकडे, मुलांच्या १६ वर्षांखालील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत नाशिकने डी.ए.आर.सी. संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर वर्चस्व मिळवले. दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने पहिल्या डावात यष्टिरक्षक श्रेयस हेकरेच्या ५६ धावांच्या जोरावर १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना डी.ए.आर.सी.चा डाव नाशिकच्या श्रेयस उगलेने १६४ धावांत गुंडाळला. श्रेयसने पहिल्या डावात ६ बळी टिपले.

२८ धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावात मैदानात उतरलेल्या नाशिकने ७ बाद १६३ धावांवर डाव घोषित केला. यामध्ये कर्णधार मुजतबा सय्यदने नाबाद १०३ धावांचे धडाकेबाज शतक झळकावले. विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य समोर असताना डी.ए.आर.सी.ने ७ बाद ९७ धावांपर्यंत मजल मारली आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. मात्र, नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले. विशेष म्हणजे, श्रेयस उगलेने दुसऱ्या डावातही ६ बळी मिळवत सामन्यात एकूण १२ बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

कौतुकाचा वर्षाव

नाशिकच्या या दोन्ही संघांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांच्यासह क्रीडा प्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

Comments

No comments yet.