तुमची आवडती मिठाई कशी बनते? आता स्वतः डोळ्यांनी पहा... असे आहे चितळे बंधूंचे 'रांजे व्हिजन पार्क'...

Share:
Main Image
Last updated: 17-Apr-2026

पुणे, (प्रतिनिधी) १७ एप्रिल - खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'चितळे बंधू मिठाईवाले' यांच्या अत्याधुनिक 'रांजे व्हिजन पार्क'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उत्साहात संपन्न झाले. सुमारे २५० कोटींची गुंतवणूक करून उभारलेला हा प्रकल्प भारतीय खाद्य उद्योगाला जागतिक नकाशावर एका नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर यांच्यासह चितळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

काय आहे 'व्हिजन पार्क'चे वैशिष्ट्य?
प्रचंड विस्तार: २५ एकर जागेवर पसरलेल्या या पार्कमध्ये मिठाई आणि नमकीनसाठी दोन स्वतंत्र आणि स्वयंचलित उत्पादन केंद्रे आहेत.
उत्पादन क्षमता: दररोज तब्बल ४० टन मिठाई आणि नमकीन तयार करण्याची या केंद्रांची क्षमता आहे.
जागतिक मानके: या प्रकल्पाला FSSC २२०००, US-FDA आणि ब्रिटीश रिटेल कन्सोरशियम यांसारखी महत्त्वाची जागतिक सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
पारदर्शक प्रक्रिया: ग्राहकांसाठी येथे विशेष 'व्ह्यूइंग गॅलरी' (निरीक्षण कक्ष) उभारण्यात आली आहे. यामुळे आपल्या आवडीचे पदार्थ कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि स्वच्छतेने बनवले जातात, हे ग्राहक स्वतः पाहू शकतील.

Advertisement

'फूड ही आपली सॉफ्ट पॉवर' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "चितळे बंधूंनी चार पिढ्यांच्या कष्टातून एक ग्लोबल ब्रँड उभा केला आहे. खाद्यपदार्थ ही एक 'सॉफ्ट पॉवर' असून, ज्याप्रमाणे जग चायनीज किंवा फ्रेंच पदार्थांकडे आकर्षित होते, त्याचप्रमाणे चितळेंचे महाराष्ट्रीयन पदार्थ आता ३५ देशांतील लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. एक्सपोर्ट ओरिएंटेड फूड इंडस्ट्रीला शासन पूर्ण सहकार्य करेल."

भविष्यातील मोठी झेप: ५ लाख टच प्वॉइंट्सचे उद्दिष्ट
संस्थेचे इंद्रनील चितळे आणि केदार चितळे यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली:
विस्तार: सध्या १० राज्यांत १.२५ लाख टच प्वॉइंट्स आहेत, जे येत्या ३ वर्षांत ५ लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
निर्यात: सध्या निर्यातीचा वाटा ८-९ टक्के असून तो २० टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे.
पर्यटन: शाळा-महाविद्यालयांच्या सहली आणि ग्राहकांसाठी लवकरच वेबसाईटवर नोंदणी करून व्हिजन पार्क पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच येथे लवकरच एक कॅफे आणि १०० मीटर लांबीची चितळेंचा प्रवास दर्शवणारी 'विशेष भिंत' देखील आकर्षणाचे केंद्र असेल.

नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय होणारे उत्पादन यामुळे हे 'व्हिजन पार्क' भारतीय खाद्य उद्योगासाठी एक आदर्श मॉडेल ठरले आहे.

?s=20

Comments

No comments yet.