नाशिक, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने कंबर कसली आहे. १८ वर्षांखालील मुलगी आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा गंभीर गुन्हा असून, असा प्रयत्न केल्यास केवळ पालकांवरच नाही, तर लग्नाशी संबंधित सर्व व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी दिला आहे.
केवळ पालकच नाही, 'हे' सर्वजण येणार कचाट्यात
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार, गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला जबाबदार धरले जाणार आहे. यात खालील घटकांचा समावेश असेल:
मध्यस्थ आणि नातेवाईक
मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिक
बॅण्ड पथक आणि भटजी (पुरोहित)
मंगल कार्यालय किंवा लॉन मालक
गावपातळीवर 'वॉच' वाढवला!
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्राम बाल संरक्षण समित्यांना अधिक सक्रिय केले आहे. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, पोलिस पाटील आणि शिक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही संशयास्पद विवाहाची माहिती मिळताच ही समिती तत्काळ हस्तक्षेप करेल आणि गरज पडल्यास पोलिसांच्या मदतीने लग्न सोहळा थांबवला जाईल.
बालविवाहाचे भीषण परिणाम
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बालविवाहामुळे केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाही, तर:
१. आरोग्यावर परिणाम: लहान वयात गर्भधारणा झाल्यामुळे मुलींच्या जिवाला धोका निर्माण होतो.
२. शिक्षण खंडित होणे: मुलींच्या शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी कायमच्या बंद होतात.
३. मानसिक खच्चीकरण: अपरिपक्व वयात जबाबदाऱ्या लादल्या गेल्याने मानसिक आरोग्य बिघडते.
गुप्त माहिती द्या, बालपण वाचवा!
जर आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल:
चाइल्ड हेल्पलाईन: १०९८
आपत्कालीन क्रमांक: ११२
जिल्हा बाल संरक्षण कक्ष: ०२५३- २९९४५१८
प्रशासनाचा सज्जड इशारा: "अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नका. बालविवाह हा सामाजिक कलंक असून तो मोडीत काढण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याने सहकार्य करावे."