एका किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल २५४ कोटींचा खर्च? महाराष्ट्रात चाललंय काय?

Share:
Main Image
Last updated: 16-Apr-2026

आजरा, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - "शक्तिपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि शेतकऱ्यांचा घोट घेणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राज्यातील तमाम शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असून, जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील," असा कडक इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने आजरा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसभेत ते बोलत होते.

निसर्ग आणि शेतीची राखरांगोळी
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, हा महामार्ग पश्चिम घाटातील अत्यंत संवेदनशील पट्ट्यातून जात आहे. डोंगर फोडून आणि हजारो वृक्षांची कत्तल करून निसर्गाचे कधीही न भरून निघणारे नुकसान केले जाणार आहे. हजारो एकर बहुपिक सुपीक जमीन अधिग्रहित करून पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचे पाप हे सरकार करत आहे.

Advertisement

खर्चाच्या आकडेवारीवरून भ्रष्टाचाराचे आरोप
या प्रकल्पाच्या वाढीव खर्चावर बोट ठेवत शेट्टी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. "सुरुवातीला ८०२ किलोमीटरचा खर्च ८६ हजार कोटी रुपये होता. आता तो ८५६ किलोमीटर करून १ लाख कोटींवर नेला आहे. म्हणजे वाढीव ५४ किलोमीटरसाठी १४ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एका किलोमीटरसाठी तब्बल २५४.५४ कोटी रुपये खर्च दाखवून या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा 'ढपला' पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास आहे," अशी प्रखर टीका त्यांनी केली.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी
राज्यातील ठेकेदारांची देणी प्रलंबित आहेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि आंबा-काजू बागायतदारांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र, जनतेच्या डोक्यावर लाखो कोटींचे कर्ज लादून स्वतःचा खिसा भरण्यासाठी हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलिसांचा धाक दाखवून शेतकरी विरोध दडपण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

नेत्यांची मोठी उपस्थिती
या सभेला विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, स्वाभिमानीचे राज्यसचिव राजेंद्र गड्यान्नावर, कॉ. गिरीष फोंडे, कॉ. संपत देसाई, कॉ. सम्राट मोरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्यासह आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.