रुपाली चाकणकर यांचे मौन सुटले! खरात प्रकरणी अखेर २८ दिवसांनी म्हणाल्या...

Share:
Main Image
Last updated: 14-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - गेल्या २८ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. "माझ्यावर आणि माझ्या परिवारावर होणारे आरोप हे केवळ बदनामीच्या हेतूने रचलेले कपोलकल्पित कारस्थान आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

निनावी पत्रावरून उपस्थित केले प्रश्न
खरात प्रकरणाशी संबंधित एका निनावी पत्रावरून सुरू असलेल्या वादावर चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हे पत्र कायदेशीरदृष्ट्या अर्थहीन असल्याचे स्पष्ट केले असतानाही, माध्यमांमध्ये दिवसभर चर्चा घडवून आणण्यामागे कोणाचे 'सौजन्य' आहे, असा रोकड सवाल त्यांनी विचारला. "हे पत्र कोणी लिहिले आणि कोठून आले, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.

'तो' पायंडा अत्यंत खेदजनक
केवळ तर्कवितर्क, अंदाज आणि रंजक अफवांच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देणे, हा एक चुकीचा पायंडा पाडला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "खरात प्रकरणातील कोणताही आर्थिक व्यवहार किंवा जमीन व्यवहाराशी आमचा दुरान्वये संबंध नाही," असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Advertisement

आतापर्यंत मौन का बाळगले?
गेले काही दिवस माध्यमांमध्ये एकतर्फी बातम्या येत असूनही चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याबाबत स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, "SIT आणि तपास यंत्रणांना निष्पक्षपातीपणे काम करता यावे, हाच माझा उद्देश होता. मात्र आता सत्याचा अपलाप होत असल्याने भूमिका मांडणे गरजेचे आहे."

सत्यावर विश्वास
"महाराष्ट्राच्या राजकारणात पुराव्यानिशी आरोप करण्याची परंपरा आहे, मात्र माझ्या बाबतीत केवळ चिखलफेक होत आहे. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा ठाम विश्वास आहे," अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली.

?s=20

Comments

No comments yet.