नाशिक, (प्रतिनिधी) १४ एप्रिल - राज्यात सध्या पीक काढणीचा हंगाम सुरू असताना पावसाच्या अफवांनी बळीराजा चिंतेत आहे. मात्र, येत्या २४ एप्रिलपर्यंत राज्यात पावसाची कोणतीही मोठी स्थिती नसून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असा दिलासा हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (निवृत्त, भारतीय हवामान विभाग, पुणे) यांनी दिला आहे. दरम्यान, एप्रिलच्या उत्तरार्धात उन्हाचा चटका अधिक तीव्र होणार असून काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
पुढील १०-१२ दिवस हवामान कोरडे
सध्या पावसासंबंधीच्या अनेक भडक बातम्या पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात शुक्रवार, दि. २४ एप्रिलपर्यंत राज्यात कुठेही पिकांचे नुकसान होईल, अशी स्थिती नाही. सोमवार (दि. २०) ते बुधवार (दि. २२) दरम्यान ठाणे, पालघर, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, अकोला, नागपूरसह १४ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, तिथेही पावसाचे प्रमाण केवळ २ ते ३ मिमी इतकेच म्हणजे अत्यंत किरकोळ असेल.
तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटांचा इशारा
येत्या शुक्रवारपर्यंत (दि. १७) राज्याचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत असेल. मात्र, शनिवार १८ एप्रिलपासून (वैशाख मासारंभ) राज्याच्या तापमानात मोठी वाढ होण्यास सुरुवात होईल. मुंबईसह संपूर्ण कोकण, नाशिक, पुणे आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहील. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) प्रभाव जाणवेल, असा इशारा खुळे यांनी दिला आहे.
मान्सून २०२६: पाऊस सरासरीपेक्षा कमी?
येत्या मान्सूनबद्दल प्राथमिक अंदाज वर्तवताना खुळे यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 'एल निनो'चा प्रभाव जाणवू शकतो. मात्र, त्याच काळात 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) धन (Positive) असण्याची शक्यता असल्याने, मान्सूनवर होणारा विपरित परिणाम काहीसा कमी होऊ शकतो. या संदर्भात सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे.
दिलासा: २४ एप्रिलपर्यंत पावसाचे संकट नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका.
तापमान: १८ एप्रिलनंतर उन्हाचा तडाखा वाढणार; विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट.
मान्सून: यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा प्राथमिक अंदाज.