संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात... स्वाधारगृहात मोफत निवास आणि प्रशिक्षणाची सोय...

Share:
Main Image
Last updated: 13-Apr-2026

सांगली, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - आयुष्यात संकट ओढवलेल्या, निराधार आणि अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना सुरक्षित आश्रय मिळावा आणि त्यांचे सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने 'स्वाधारगृह/शक्तीसदन' योजना राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये भगिनी निवेदिता प्रतिष्ठान द्वारे ही योजना यशस्वीपणे चालवण्यात येत असून, गरजू महिलांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणाला मिळणार प्रवेश?
या योजनेअंतर्गत १६ ते ६० वयोगटातील निराधार, निराश्रित, विधवा, परितक्त्या, कुमारी-माता, कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचाराला बळी पडलेल्या संकटग्रस्त महिलांना प्रवेश दिला जातो. महिलांच्या संरक्षणासोबतच त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

मिळणाऱ्या सोयी-सुविधा:
स्वाधारगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या महिलांसाठी खालील गोष्टी मोफत उपलब्ध आहेत:
निवास व भोजन: सुरक्षित राहण्याची सोय आणि पौष्टिक आहार.
शिक्षण व प्रशिक्षण: औपचारिक शिक्षणासोबतच विविध व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण.
पुनर्वसन: महिलांना समाजात पुन्हा मानाने जगता यावे, यासाठी समुपदेशन आणि कायदेशीर मदत.

Advertisement

प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत सोपी
महिलेस या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी संस्थेच्या अधीक्षकांकडे थेट अर्ज करता येतो. याशिवाय जिल्हा महिला बालविकास कार्यालय, पोलीस कार्यालय, सामाजिक संस्था किंवा स्थानिक समाजसेवकांमार्फतही या केंद्रात प्रवेश मिळवता येतो.

महत्त्वाचे मदत क्रमांक:
पत्ता : भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली संचलित स्वाधारगृह, जुने पोलिओ सेंटर स्कायलर्क स्कूलजवळ  यशवंतनगर सांगली, संपर्क क्रमांक – 8237935546/9272195069

संकटसमयी तत्काळ मदतीसाठी खालील हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत:
वुमन हेल्पलाईन (टोल फ्री): १८१
बालकांच्या मदतीसाठी (टोल फ्री): १०९८

समाजातील संकटग्रस्त महिलांनी कोणत्याही भीतीपोटी किंवा संकोचापोटी मागे न राहता, या हक्काच्या आधारकेंद्राचा लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग सुकर होईल.

Comments

No comments yet.