टिटवाळा, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव सिमेंट मिक्सर आणि प्रवाशांनी गच्च भरलेल्या 'काळी-पिवळी' इको टॅक्सीची समोरासमोर भीषण धडक होऊन ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः पत्र्याचा गोळा झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मुरबाड परिसरातील काही रहिवाशी सोमवारी सकाळी इको गाडीने (टॅक्सी) कल्याणच्या दिशेने जात होते. सकाळी ११:१५ च्या सुमारास पांजार पुलावर ही गाडी आली असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने कारला जोरदार धडक दिली. सिमेंट मिक्सरचा वेग इतका प्रचंड होता की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. धडकेनंतर कारचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले होते.
१० जणांचा जागीच अंत; आजींचा जीव वाचला
या कारमध्ये एकूण १२ प्रवासी होते. त्यापैकी १० ते ११ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. या भीषण अपघातात एक वृद्ध आजी मात्र आश्चर्यकारकरित्या बचावल्या असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
स्थानिकांचे पाणावले डोळे
अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीच्या पत्र्यात अडकलेले मृतदेह बाहेर काढताना स्थानिकांच्या डोळ्यातही पाणी आले होते. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
वाहतूक विस्कळीत, तपास सुरू
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. हा अपघात नेमका वेगामुळे झाला की चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे, याचा तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.
?s=20