यशोगाथा... कौशल्य विकास योजनेतून आरती गमे यांची भरारी !  प्रशिक्षणातून मिळवले आर्थिक स्वावलंबन

Share:
Main Image
Last updated: 13-Apr-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १३ एप्रिल - सात वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर खचून न जाता शासकीय कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या जोरावर जिद्दीने उभ्या राहिलेल्या चास येथील आरती पंडित गमे आज प्रतिमहिना ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. धनसंपदा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवणकाम व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू केला असून, त्या परिसरातील इतर १२५ महिलांनाही स्वावलंबी बनवत आहेत. संकटाचे रूपांतर संधीत करणाऱ्या आरतीताईंच्या या यशोगाथेने नारी शक्तीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

कौटुंबिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आधार घेतला. त्यांनी फॅशन डिझाईनिंग व ब्युटी पार्लर यांसारखी तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली. या प्रशिक्षणाने त्यांना केवळ रोजगारच मिळवून दिला नाही, तर त्यांच्यात व्यावसायिक आत्मविश्वासही निर्माण केला. आज त्या स्वतःचा व्यवसाय सांभाळून प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

Advertisement

आरतीताईंनी आतापर्यंत १०० हून अधिक महिलांना मोफत मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी छोटे-मोठे उद्योग सुरू केले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे.

 "शासनाची कौशल्य विकास योजना माझ्यासारख्या गरजू महिलांसाठी वरदान ठरली आहे, या प्रशिक्षणामुळेच मी माझ्या मुलांचे शिक्षण व घराची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकले," असे त्या अभिमानाने सांगतात. चिकाटी व कौशल्याच्या बळावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील महिलांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

No comments yet.