नाशिकमध्ये मुलींच्या अपहरणाचे सत्र सुरूच... एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता...

Share:
Main Image
Last updated: 12-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ एप्रिल - शहरात गेल्या काही दिवसांपासून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवारी (दि. ११) शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मामाच्या गावी आलेली मुलगी बेपत्ता
पहिली घटना म्हसरूळ परिसरातील वरवंडी रोडवर घडली. सूर्यवंशी मळ्यातील एका कुटुंबात सुट्ट्यांसाठी आपल्या मामाच्या घरी आलेली अल्पवयीन मुलगी शनिवारी रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. रात्री कुटुंबिय गाढ झोपेत असताना ती कुणासही काही न सांगता घराबाहेर पडली. मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. अखेर याप्रकरणी मुलीच्या मामाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपनिरीक्षक जोशी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

गंजमाळ भागातून दुसरी मुलगी बेपत्ता
दुसरी घटना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळ भागात घडली. येथील पंचशील नगरमध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी शनिवारी सकाळपासून घरातून गायब आहे. घरात कोणालाही काहीही कल्पना न देता ती निघून गेल्याने पालकांनी भीती व्यक्त केली आहे. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
शहरात अचानक वाढलेल्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलींना आमिष दाखवून पळवून नेणारी टोळी सक्रिय आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Comments

No comments yet.