नाशिक, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - शहरातील नांदूरनाका परिसरात स्वतःला पेटवून घेतलेल्या ३४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने गेल्या शनिवारी टोकाचे पाऊल उचलले होते. सहा दिवस खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. १०) त्याची प्राणज्योत मालवली.
घटनेचा थरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज शिवाजी चौधरी (३४, रा. फुलगाव वरनगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या शनिवारी (दि. ४ एप्रिल) दुपारच्या सुमारास जत्रा लिंक रोडवरील नांदूरनाका भागात मनोजने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आग लावून घेतली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
उपचारादरम्यान मृत्यू
या घटनेत मनोज गंभीररीत्या भाजला होता. त्याची बहीण डॉ. सीमा चौरे यांनी त्याला तात्काळ जवळच्या लोकमान्य रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वेदांत हॉस्पिटल आणि त्यानंतर अशोका मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्याची प्रकृती अधिक खालावली आणि डॉ. शैलेश पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू
या दुर्दैवी घटनेबाबत डॉ. तेजस्विनी पारखे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली असून, मनोजने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार देसाई या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नैराश्य किंवा कोणत्याही मानसिक संकटात टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी मदतीसाठी तज्ज्ञांशी संवाद साधा. जीवन अनमोल आहे.