जमीन मोजणीत हायटेक क्रांती... ९० दिवसांचे काम आता पंधरा दिवसात...

Share:
Main Image
Last updated: 11-Apr-2026

अमरावती, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - जमीन मोजणीच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नियमित मोजणीचा कालावधी आता ९० दिवसांवरून थेट १५ दिवसांवर आणावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भूमापन दिनानिमित्त भूमी अभिलेख विभागामार्फत अत्याधुनिक मोजणी उपकरणांच्या वाटप प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला आमदार सुलभाताई खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यंत्रसामुग्री वाढवली, आता वेग वाढवा!
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, "पूर्वी नियमित मोजणीसाठी ९० दिवस आणि 'द्रुतगती' (Fast track) मोजणीसाठी ३० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, आता मोजणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हा कालावधी १५ दिवसांपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. जर जिल्ह्यात मनुष्यबळ कमी पडत असेल, तर जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने भरती प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करावे."

'भू-नक्शा' प्रकल्पाची अंमलबजावणी
राज्यात प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी 'भू-नक्शा' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. नगर भूमापनचे काम अधिक अचूक आणि डिजिटल स्वरूपात व्हावे, यासाठी अमरावती जिल्ह्यातही या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

Advertisement

अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने होणार असून, भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी केलेल्या पाच वाहनांना पालकमंत्री बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. ही वाहने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरूड तहसिलदारांना वितरीत करण्यात आले.

?s=20

Comments

No comments yet.