मुंबई, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर मोठी पदभरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. विभागातील ८ हजार ६६९ नियमित पदे भरली जाणार असून, यामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रशासकीय रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. काही जुनी पदे निरसित (रद्द) करून त्याऐवजी १६५ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता विभागात एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर झाली असून, लवकरच ही भरती प्रक्रिया राबवली जाईल.
भरतीचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे:
नियमित पदे: ८,६६९ पदे कायमस्वरूपी (नियमित) भरली जातील.
बाह्ययंत्रणा (Outsourcing): विभागाच्या दैनंदिन कामकाजाला गती देण्यासाठी २,८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचारी: एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १,१०,६६४ अंगणवाडी सेविका आणि १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदांना मंजुरी मिळाली आहे.
योजनांची अंमलबजावणी होणार प्रभावी
"गेल्या २३ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा निर्णय विभागाचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे महिला आणि बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि तळागाळापर्यंत पोहोचवता येईल."
- आदिती तटकरे, मंत्री