मुंबई, (प्रतिनिधी) ११ एप्रिल - राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण गुजरातच्या भावनगरमध्ये एका महिला नगरसेविकेने अवघ्या तीन तासांत जो 'राजकीय चमत्कार' करून दाखवला, त्याने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सेजल घेहेल यांनी सकाळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र दुपार व्हायच्या आतच त्या पुन्हा 'कमळ' हाती धरून भाजपमध्ये परतल्या. विशेष म्हणजे, या संपूर्ण नाट्यात 'ईडी'च्या (ED) कारवाईची चर्चा रंगली असताना, प्रत्यक्षात कारण मात्र 'असुरक्षितता' आणि 'बूटलेगर्स'चा (दारू माफिया) विषय असल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
भावनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या माजी नगरसेविका सेजल गोहेल यांनी सोमवारी सकाळी अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. "मी नगरसेविका असूनही मला भाजपमध्ये सुरक्षित वाटत नाही. शहरात बूटलेगर्सचा (अवैध दारू विक्रेते) त्रास वाढला आहे आणि पक्ष त्याकडे दुर्लक्ष करत आहे," असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली.
३ तासांत 'घरवापसी'चा यू-टर्न
सेजल गोहेल यांनी काँग्रेसचा हात धरल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, हा आनंद काँग्रेससाठी औटघटकेचाच ठरला. अवघ्या तीन तासांनंतर सेजल पुन्हा भाजप कार्यालयात पोहोचल्या आणि त्यांनी पुन्हा भाजपचे उपरणे गळ्यात घातले.
या 'यू-टर्न'नंतर पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या, "काही काँग्रेस नेत्यांनी मला भूलथापा देऊन आणि दिशाभूल करून पक्षात घेतले होते. मी त्यांच्या प्रभावाखाली येऊन चूक केली होती. पण मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि मी पुन्हा माझ्या मूळ घरी (भाजप) परतले आहे."
ईडीची चर्चा की दबाव?
या वेगवान घडामोडींनंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की, कदाचित ईडी (अंमलबजावणी संचालनालय) किंवा इतर तपास यंत्रणांच्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय बदलला. मात्र, सेजल यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी आपल्या सुरक्षिततेचा आणि स्थानिक प्रश्नांचा मुद्दा लावून धरला होता, पण अवघ्या काही तासांत त्यांची ही 'असुरक्षितता' कशी दूर झाली, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काँग्रेसचा पलटवार
दरम्यान, काँग्रेसने सेजल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. "त्या स्वतःहून आमच्याकडे आल्या होत्या. गेल्या ३-४ महिन्यांपासून त्या संपर्कात होत्या. आम्ही कोणावरही दबाव टाकला नाही. भाजपच्या दबावाखाली येऊनच त्या पुन्हा तिथे गेल्या असाव्यात," अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.
गुजरातमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या 'झटपट-पटापट' पक्षांतराची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.